ये तो झाकी है; विखे पाटील यांच्या पराभवानंतर आमदार निलेश लंके पोहोचले थेट राहत्यात
By अण्णा नवथर | Updated: June 19, 2023 15:36 IST2023-06-19T15:33:14+5:302023-06-19T15:36:10+5:30
गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.

ये तो झाकी है; विखे पाटील यांच्या पराभवानंतर आमदार निलेश लंके पोहोचले थेट राहत्यात
अण्णा नवथर, अहमदनगर : "ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है" असे म्हणत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दारूण पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे; तर विखे यांच्या विरोधातील बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या परिवर्तन पॅनलला १८ जागावर विजय मिळवला आहे. त्यानंतर आमदार निलेश लंके थेट राहत्यामध्ये पोहोचले असून त्यांनी सर्व सभासद मतदारांचे आभार मानले आहेत.
विखे पाटील यांच्या पराभवाबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले, खऱ्या अर्थाने दहशतवादाला राहत्यातील जनतेनेच मूठमाती दिली आहे. ही परिवर्तनाला खरी तर सुरुवात झाली आहे. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले आहेत. गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे पाटील यांचा झालेला पराभव म्हणजे विखे पाटील यांच्या दडपशाहीला फुलस्टॉप असल्याचेही लंके यांनी म्हटले आहे. तसेच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले पार्सलही परत पाठवणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
यापूर्वीच्या भाषणाचा उल्लेख करत लंके म्हणाले की, निलेश लंके यांना आमदार व्हायची इच्छा दिसत नाही असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर लंके म्हणाले, मला आमदार करायचं का नाही ते जनता ठरवेल? परंतु तुमच्या मुलाला खासदार करायचे की नाही? ते आता आम्ही ठरवू असा टोलाही त्यांनी लगावला.