पेडगावनंतर चांडगावातही कॅफेनयुक्त शीतपेयांवर बंदी, ग्रामपंचायतीचा ठराव; पालकांमधून निर्णयाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 23:44 IST2025-02-11T23:43:02+5:302025-02-11T23:44:10+5:30
अठरा वर्षांखालील व्यक्तींना असे कॅफेनयुक्त शीतपेय देण्यास बंदी असताना सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे मंगळवारी ग्रामपंचायतीने विक्रीवर बंदी आणणारा ठराव मंजूर केला आहे.

प्रतिकात्मक फोटो
आढळगाव (जि. अहिल्यानगर) : कॅफेनयुक्त शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक घेण्याची झिंक ग्रामीण भागातील शाळकरी मुलांमध्ये वाढत आहे. हा धोका लक्षात घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव व चांडगावातील ग्रामपंचायतनेही ठराव करुन या शीतपेयांच्या गावातील विक्रीवर बंदी घातली आहे.
अठरा वर्षांखालील व्यक्तींना असे कॅफेनयुक्त शीतपेय देण्यास बंदी असताना सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे मंगळवारी ग्रामपंचायतीने विक्रीवर बंदी आणणारा ठराव मंजूर केला आहे. कॅफेनयुक्त शीतपेय आणि तस्सम पेयांकडे ग्रामीण भागातील शाळकरी मुलांचा कल वाढत आहे. गावामध्येच सहजासहजी मिळणाऱ्या या शीतपेयांच्या पार्ट्यांची चर्चा किशोरवयीन मुलांच्या वाढदिवसांनाही होऊ लागल्या आहेत. शाळकरी मुलांच्या हाती या शीतपेयांच्या बाटल्या पाहून सुजाण पालकांना याचा धोका वाटत होता. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील मुलांमध्ये या ड्रिंकची क्रेझ वाढत चालली आहे. पालकांच्या चिंतेची दखल घेऊन तालुक्यातील चांडगाव येथील सरपंच मनिषा म्हस्के यांनी पुढाकार घेत कॅफेनयुक्त शीतपेय, एनर्जी ड्रिंकवर बंदीचा ठराव केला. गावातील विक्रेत्यांना विश्वासात घेऊन शाळकरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून गावाच्या हितासाठी अशा शीतपेयांची विक्री बंद करण्याचे आवाहन केले आहे.
तालुक्यातील पेडगाव येथे एका शाळकरी विद्यार्थ्याचा जीव अशा शीतपेयामुळे गेल्याची चर्चा झाल्यानंतर या पेयांवर बंदी घालण्याचा ठराव घेणारे पेडगाव हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले. येथील सरपंच इरफान पिरजादे यांनी पुढाकार घेऊन बंदीचा ठराव केला होता.
शाळकरी मुले हे देशाचे भविष्य आहेत आणि हीच मुले या कॅफेनयुक्त शीतपेयांच्या आहारी जात असल्याचे चित्र लक्षात घेऊन या शीतपेयांची विक्री बंदीचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
-मनिषा म्हस्के, सरपंच. ग्रामपंचायत चांडगाव.
मोठ्या गावांनी पुढाकार घेण्याची गरज
कॅफेनयुक्त शीतपेयांचा आग्रह हा व्यसनाधीनतेकडे वाटचाल होण्याचा धोका आहे त्यामुळे आढळगाव, हिरडगाव, शेडगावसारख्या मोठ्या गावांनीही बंदीचा निर्णय घेण्याची गरज पालकांमधून व्यक्त होत आहे.