दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई
By Admin | Updated: February 16, 2023 11:44 IST2014-09-04T23:02:28+5:302023-02-16T11:44:22+5:30
श्रीरामपूर : माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली.

दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई
श्रीरामपूर : माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली. खत विक्रीबाबत गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आल्याने तेथील दोन्ही दुकानांमधील खताच्या ६१ गोण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी विष्णू साळवे व पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गणेश अनारसे यांनी माळवाडगाव येथील दौलत रामकृष्ण दांगट यांच्या मालकीच्या अभिषेक कृषी सेवा केंद्र व सुमन पांडुरंग शिंदे यांच्या मालकीच्या जगदंबा कृषी सेवा केंद्रास भेट देऊन तपासणी केली. तेव्हा रासायनिक खत विक्रीबाबत गंभीर स्वरूपाच्या उणिवा आढळल्या. त्यामुळे दोन्ही दुकानांतील उपलब्ध रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचा आदेश जागेवर देण्यात आला.
जगदंबा कृषी सेवा केंद्रात खत परवान्याचे नूतनीकरण करवून न घेता खत विक्री करण्यात येत होती. तसेच खरेदी करण्यात आलेल्या खताची बिले नसणे, शेतकऱ्यास खरेदीची बिले न देणे, साठा नोंदवही न ठेवणे यासारख्या गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे या दुकानातील डी.ए.पी. २०:२०:०, १८:१८:१० या स्वरूपाच्या खताच्या ३७ गोण्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली. या गोण्यांची किंमत ४८ हजार ५२५ रूपये आहे. अभिषेक कृषी सेवा केंद्रातही खताची खरेदी बिले न ठेवणे, साठा नोंदवहीत नोंद न ठेवणे, अहवाल सादर न करणे, गोदामातील साठा विक्री साठा यांचा ताळमेळ नसणे यासारख्या गंभीर त्रुटी आढळल्या. या दुकानातील १८ हजार ३५७ रूपये किंमतीच्या डी.ए. पी., युरिया, १०:२६:२६ या खताच्या २४ गोणांन्या विक्री बंद आदेश बजावण्यात आला.या दोन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती विष्णू साळवे यांनी दिली.