शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवरील गोळीबारासंदर्भात चौकशी अहवालानंतर कारवाई : राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:08 IST2017-11-20T19:06:49+5:302017-11-20T19:08:19+5:30
शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारप्रकरणाची उपविभागीय दंडाधिका-यांमार्फत चौकशी सुरू असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाईबात निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवरील गोळीबारासंदर्भात चौकशी अहवालानंतर कारवाई : राम शिंदे
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारप्रकरणाची उपविभागीय दंडाधिका-यांमार्फत चौकशी सुरू असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाईबात निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.
गोळीबारात जखमी झालेल्या दोघा शेतक-यांची शिंदे यांनी सोमवारी येथील खासगी रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. गेली चार ते पाच दिवस नियोजित दौरे असल्याने शेतक-यांची भेट घेता आली नाही, मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जखमींची भेट घेतली होती, असे सांगत पालकमंत्री म्हणाले, जखमी झालेले शेतकरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याने तेथील जिल्हाधिका-यांमार्फत त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून धनादेश देण्यात येणार आहे. खानापूर येथील आंदोलन ही मोठी घटना होती़ जाहीर केलेल्या एफआरपीप्रमाणे शेतक-यांना उसाला दर मिळणार आहे.
खासगी साखर कारखाने आणि शेतक-यांमध्ये समन्वय राखने ही सरकारचीच जबाबदारी आहे. याच दृष्टिकोणातून २३ नोव्हेंबर रोजी नगर व नाशिक विभागांतील साखर कारखाने व शेतक-यांची समन्वय बैठक ठेवण्यात आलेली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. यामध्ये ऊसउत्पादकांचे प्रश्न समजून घेण्यात येणार आहेत.
पालकमंत्र्यांनी भेट घेतली तेव्हा जखमी शेतकरी उद्धव मापारी यांनी आंदोलनादरम्यान शेतक-यांवर दाखल झाले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्र्यांनीही त्यांना सकारात्मक उत्तर देत काळजी घेण्याचे सांगितले. यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) संगीता डोंगरे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.