विश्वजित कासार टोळीविरोधात ‘मोका’अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST2021-03-16T04:21:23+5:302021-03-16T04:21:23+5:30
अहमदनगर : कुख्यात गुंड विश्वजित रमेश कासार याच्यासह त्याच्या आठ साथीदारांविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोका) कायद्यातंर्गत कारवाई केली ...

विश्वजित कासार टोळीविरोधात ‘मोका’अंतर्गत कारवाई
अहमदनगर : कुख्यात गुंड विश्वजित रमेश कासार याच्यासह त्याच्या आठ साथीदारांविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोका) कायद्यातंर्गत कारवाई केली आहे. कासार टोळीविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली.
विश्वजित कासार याच्यासह त्याचा भाऊ इंद्रजित (रा. दोघे वाकळी, ता. नगर) तसेच सुनील फक्कड अडसरे (रा. शेडाळे, ता. आष्टी, जि. बीड), शुभम बाळासाहेब लोखंडे (रा.करडे, ता. शिरुर, जि.पुणे), सचिन भामरे (रा. खेतमाळीसवाडी, ता. श्रीगोंदा), मयूर बापूसाहेब नाईकवाडी (रा. वाकळी, ता. नगर) भरत भिमाजी पवार (रा. दहिगाव साकत, ता. नगर), संतोष भाऊसाहेब धोत्रे (रा. कामरगाव, ता. नगर) व संकेत भाऊसाहेब भालसिंग (रा. वाकळी, ता. नगर) यांच्यावर मोकातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील विश्वजित व इंद्रजित यांच्यासह मयूर नाईकवाडी, भरत पवार, संतोष धोत्रे या पाच जणांना अटक झालेली असून उर्वरित चार जण फरार आहेत. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
विश्वजित व त्याच्या साथीदारांनी वाळकी येथे १७ नोव्हेंबर २०२० रोजी ओंकार बाबासाहेब भालसिंग या तरुणाला समोरून वाहनाने धडक देत लोखंडी पाइप व लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले होते. ओंकार याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये विश्वजित व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विश्वजित व त्याचा भाऊ इंद्रजित यांना अटक केली होती. पोलिसांनी याच गुन्ह्याला मोका लावला आहे.
-----------------------------
कासारविरोधात २२ गुन्हे
मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला विश्वजित कासार याच्यावर जिल्ह्यासह राज्यातील विविध पोलीस ठाण्यात दंगा, फसवणूक, विनयभंग, सरकारी कामात अडथळा, आर्म ॲक्ट, खून असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सुरुवातील एकटाच गुन्हे करणाऱ्या कासारने काही दिवसांतच स्वत:ची टोळी तयार करून गुन्हे करू लागला. रेल्वेत नाेकरीचे आमिष दाखवून कासार याने २०१४ मध्ये काही बेरोजगार तरुणांना गंडा घातला होता.