अहमदनगर : खासगी कोविड रुग्णालयांकडून नियमबाह्य बिले अकारले जात असल्याचे समोर आले असून, सर्वसामान्यांची बेकायदशीररीत्या लूट करणाऱ्या रुग्णांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तशा सूचना लेखा परीक्षकांना करण्यात आल्या आहेत.
महापाैर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आरोग्य समितीचे सदस्य व कोरोना रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक झाली. बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सदस्य निखिल वारे, सचिन जाधव, सतीश शिंदे, लेखाधिकारी प्रवीण मानकर, निवृत्ती खेतमाळीस, राजेंद्र येळीकर, सुरेश घायमुक्ते, रमेश कासार, भाग्यश्री जाधव आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकट काळात रुग्णालयांकडून गैरफायदा घेतला जात असून, याबाबतचे पुरावेही उपलब्ध आहेत. शासनाचे नियम डावलून बिलांची आकारणी शहरातील काही रुग्णालये करत आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून तक्रारी प्राप्त हात असून, अशा रुग्णालयांतील बिले तपासून तत्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच फरकाची रक्कम रुग्णांना नंतर न देता बिल कमी करून देणे योग्य होईल, अशी सूचना यावेळी आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी लेखापरीक्षण समितीने बिलांबात नाराजी व्यक्त केली. शहरातील काही रुग्णालय शासनाने ठरवून दिलेल्या आदेशामध्ये पळवाटा काढून कोरोनाच्या रुग्णांना वाढीव बिले देत आहेत. काही खासगी रुग्णालयांनी तर लेखा परीक्षकांना बसण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिलेली नाही, तसेच रुग्णांना सुट्टी देण्यापूर्वी माहिती दिली जात नाही. त्यामुळे बिलांची तपासणी होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.......
डॉक्टरांची गुरुवारी बैठक
शहरातील खासगी कोविड रुग्णालयांतील डॉक्टर किंवा त्यांच्या प्रतिनिधींची बैठक येत्या गुरुवारी महापालिकेत घेण्यात येणार आहे. या बैठकी वाढीव िबिलांसह त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील, तसेच महापालिकेची परवानगी न घेता कोविड रुग्णालये सुरू असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही समितीचे अध्यक्ष बोरुडे यांनी दिला आहे.