तीन गावठी कट्टे बाळगणारा आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:27+5:302021-01-15T04:18:27+5:30
अहमदनगर : तीन गावठी कट्टे (पिस्तूल) बाळगणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. १३ जानेवारी रोजी राहुरी ...

तीन गावठी कट्टे बाळगणारा आरोपी अटकेत
अहमदनगर : तीन गावठी कट्टे (पिस्तूल) बाळगणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. १३ जानेवारी रोजी राहुरी येथे ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात आज, शुक्रवारी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध अग्निशस्त्रधारकांवर कडक कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या संदर्भात माहिती घेत असताना १३ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे एका व्यक्तीकडे गावठी कट्टे असल्याबाबत समजले. त्यानुसार पथकाने गुंजाळे गावात खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून पप्पू ऊर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल (वय २४) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन देशी बनावटीचे गावठी गट्टे व तीन जिवंत काडतुसे असे एकूण ९१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------
फोटो - १४एलसीबी
तीन गावठी कट्टे बाळगणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आला.