चोरट्यांच्या कारला अपघात; दोघे ठार, मुलाचे अपहरण करून करत होते पोबारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 09:58 IST2021-08-07T09:58:01+5:302021-08-07T09:58:26+5:30
Accident News: मायंबा-सावरगाव मार्गावर एका शाळकरी मुलाचे अपहरण करत त्याच्याकडील सोने ओरबाडून कारमधून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला.

चोरट्यांच्या कारला अपघात; दोघे ठार, मुलाचे अपहरण करून करत होते पोबारा
तिसगाव (अहमदनगर) : मायंबा-सावरगाव मार्गावर एका शाळकरी मुलाचे अपहरण करत त्याच्याकडील सोने ओरबाडून कारमधून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला. त्यांनी मुलाला मध्येच उतरवले. पण तरीही ग्रामस्थांनी पाठलाग सुरूच ठेवल्याने या कारने तिसगाव (ता. पाथर्डी) बसस्थानक परिसरात तीन दुचाकी व एका कारसह एका पादचाऱ्याला उडविले. यात दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
अपघाताची वाहने बराच काळ महामार्गावरच पडून राहिली. त्यामुळे तिसगावातील तिहेरी मार्गावर एक किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नाने दीड तासानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. गंगाधर बुधवंत, रमेश नरवडे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
तिघा अज्ञात तरुणांनी शुक्रवारी मायंबा-सावरगाव रस्त्यावर शेताकडे जात असलेल्या चैतन्य भगत यास अडवून कारमध्ये घेतले व चाकूचा धाक दाखवून त्यास मारहाण केली. गळ्यातील सोने, मोबाईल हिसकावले. ही घटना सावरगाव येथे समजताच ग्रामस्थांनी त्या कारचा पाठलाग सुरू केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच चाेरट्यांनी चैतन्यला वृद्धेश्वर घाटात सोडून दिले. घाटशिरसहून ही कार श्री क्षेत्र मढीमार्गे तिसगावकडे भरधाव आली. तिसगाव बसस्थानक परिसरात तीन दुचाकी व एका कारसह एका पादचाऱ्याला कारने जोराची धडक दिली. त्यानंतर अपहरण करणाऱ्यांची कार एका दुकानाला आदळून बंद पडली. त्यानंतर कारमधील तिघे जण पळून गेले.
धडक बसलेल्यांमधील गंगाधर बुधवंत व रमेश नरवडे यांचा मृत्यू झाला, तर बाळू केदार, सचिन घोरपडे, प्रा. प्रकाश लवांडे हे तिघे जखमी झाले. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करीत वाहतूक सुरळीत केली.