आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 06:39 IST2025-12-28T06:39:23+5:302025-12-28T06:39:41+5:30
गेडाम यांनी शनिवारी देवस्थानच्या विभागप्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. तत्पूर्वी सकाळी सात वाजता त्यांनी वेशभूषा बदलून पूजा साहित्य विक्रेत्यांच्या दुकानांना भेटी देत पूजेसाठी आकारल्या जाणाऱ्या दरांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांना एकाने ११०० रुपयांना पूजेचे ताट दिले.

आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार
सोनई (जि. अहिल्यानगर) : शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानाचा कारभार प्रशासक म्हणून ताब्यात घेतलेले नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शनिवारी वेशभूषा बदलून पूजा साहित्य खरेदीचा अनुभव घेतला. एका दुकानदाराने चक्क ११०० रुपयांना त्यांनाच पूजेचा ताट विकले. अवाजवी दराने पूजा साहित्य विकले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गेडाम यांनी सर्व विक्रेत्यांना दर फलक लावण्याचे आदेश दिले.
गेडाम यांनी शनिवारी देवस्थानच्या विभागप्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. तत्पूर्वी सकाळी सात वाजता त्यांनी वेशभूषा बदलून पूजा साहित्य विक्रेत्यांच्या दुकानांना भेटी देत पूजेसाठी आकारल्या जाणाऱ्या दरांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांना एकाने ११०० रुपयांना पूजेचे ताट दिले.
लटकू पद्धत बंद करणार
लटकूंबाबत खासगी वाहनतळ व देवस्थान वाहनतळ दुकानदारांची आयुक्त डॉ. गेडाम यांनी जनसंपर्क कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, लटकूंमुळे भाविकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे लटकू पद्धत बंद केली जाईल. तसेच, पूजा साहित्य खूप जादा दराने विकले जात असून, याबाबत सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यासाठी सर्वांनी पूजेच्या दराचे मोठे फ्लेक्स लावा. भाविकांना सक्ती करू नका. अशा तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
डॉ. गेडाम म्हणाले की, देवस्थानात जास्त कर्मचारी दिसत आहेत. एवढ्या कर्मचाऱ्यांची गरज आहे का? यापुढे कामकाजात हलगर्जी चालणार नाही. शनी भक्तांना येथे येऊन समाधान लाभले पाहिजे, असे काम करावे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, गटविकास अधिकारी संजय लखवाल उपस्थित होते.