शाळेत जाणाऱ्या मुलीला स्कूल बसने चिरडले, कोपरगाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 19:51 IST2023-07-31T19:51:02+5:302023-07-31T19:51:16+5:30
अपघातात मुलगी ठार तर तिचा भाऊ जखमी.

शाळेत जाणाऱ्या मुलीला स्कूल बसने चिरडले, कोपरगाव तालुक्यातील घटना
कोपरगाव : सायकल वरून शाळेत निघालेल्या बहीण- भावाला स्कूल बसने धडक दिली. या अपघातात तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला, तर तिचा अकरा वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल समोर सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील रहिवासी कोमल नारायण पगारे (वय १३) व तीचा भाऊ ऋतिक नारायण पगारे (वय ११) हे दोघे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसने (एमएच १७ बीडी १८०१) बहिण- भावाला जोरदार धडक दिली. अपघातानंतर बसचालक योगेश भाऊसाहेब खिल्लारी घटनास्थळावरून पळून गेला.
या अपघातात कोमलचा जागीच मृत्यू झाला तर तिचा भाऊ ऋतिक यास गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कोमलचे वडील नारायण नाना पगारे (वय ३५ रा. पडेगाव, ता.कोपरगाव) यांनी स्कूल बसचालकाविरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून बसचालक योगेश भाऊसाहेब खिल्लारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुसरे हे करीत आहेत.