नगर शहरात १८ फुटी चबुतऱ्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा १२ फुटी पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 19:12 IST2023-05-02T19:12:01+5:302023-05-02T19:12:16+5:30
शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

नगर शहरात १८ फुटी चबुतऱ्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा १२ फुटी पुतळा
अहमदनगर: शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. १८ फुटी चबुतऱ्यावर महाराजांचा १२ फुटी पुतळा उभारला जाणार असून परिसरात सुशोभीकरण केले जाणार आहे. या कामासाठी २९ लाख रुपये खर्च येणार आहे.
प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या कामाला तत्काळ प्रारंभ करावा, या मागणीसाठी कृती समितीने दोन दिवस उपोषण केले. त्यानंतर मनपाने पुतळा बसविण्याची जागा बंदिस्त करून तेथे फलक लावला. दरम्यान, याबाबत तातडीने स्थायी समितीची सभा आयोजित करून निविदा मंजुरीचा विषय सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर (अजेंडा) घेण्यात आला. मंगळवारी सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला नगरसेवक संपत बारस्कर, मुदस्सर शेख, प्रदीप परदेशी, पल्लवी जाधव, ज्योती गाडे आदी उपस्थित होते.
आमच्या कार्यकालात नगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविला जात असल्याचा असल्याचा आम्हाला आनंद आहे. प्रशासनाने या कामाला गती द्यावी, तसेच येत्या १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी या कामाचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे यावेळी सभापती कवडे यांनी सांगितले. दरम्यान, या पुतळ्यासाठी पोलिस, राज्याचे मुख्य वास्तुविशारद, कलासंचालनालय यांची परवानगी मिळाली असून केवळ नगरविकास विभागाची परवानगी बाकी असल्याचे शहर अभियंता मनोज पारखे यांनी सांगितले.