भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे ९ फूट अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:07 IST2018-02-26T13:03:03+5:302018-02-26T13:07:21+5:30
भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाची मोजणी केली होती. त्यात गांधी यांनी ९ फूट अतिक्रमण केल्याचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केला आहे.

भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे ९ फूट अतिक्रमण
अहमदनगर : भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थान अतिक्रमणात असल्याची तक्रार त्यांचेच नातेवाईक विनोद अमलोक गांधी यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या नगररचना विभागाने मागील आठवड्यात गांधी यांच्या निवासस्थानाची मोजणी केली होती. त्यात गांधी यांनी ९ फूट अतिक्रमण केल्याचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केला आहे.
मागील आठवड्यात मंगळवारी (दि़२०) दुपारी खासदार गांधी यांच्या निवासस्थानाची मोजणी खासदार गांधी यांचे पुत्र तथा नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. खा. गांधी यांचे धार्मिक परीक्षा बोर्डाजवळ (आयटीआय कॉलेज परिसर) बंगला आहे. या बंगल्याचे रस्त्यामध्ये अतिक्रमण झाल्याची तक्रार त्यांचेच नातेवाईक विनोद गांधी यांनी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर महापालिकेचे नगररचनाकार संतोष धोंगडे यांच्या पथकाने मोजणी केली. या मोजणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असून, त्यात गांधी यांनी ९ फूट अतिक्रमण केल्याचे म्हटले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.