७१८ जणांना कावीळ
By Admin | Updated: February 18, 2023 10:50 IST2014-09-04T23:03:08+5:302023-02-18T10:50:25+5:30
अहमदनगर: शहरासह उपनगरांतील काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ दूषित पाणी पिल्याने आणखी २० जणांना कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले

७१८ जणांना कावीळ
अहमदनगर: शहरासह उपनगरांतील काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ दूषित पाणी पिल्याने आणखी २० जणांना कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले असून, काविळीच्या रुग्णांची संख्या गुरुवारी ७१८ वर पोहोचली आहे़ त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे़
रेल्वेस्टेशन रस्त्यावरील आगरकर मळ्यात दूषित पाणीपुरवठा होत होता़ परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच होता़ हे पाणी पिल्याने परिसरातील नागरिकांना कावीळ रोगाची लागण झाली़ सुरुवातीला ही संख्या कमी होती़ मात्र काही दिवसांतच ती वाढली़ परिसरातील नगरसेवकांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आणि महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या़ फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून, घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आणखी २० जणांना कावीळ झाल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे काविळीच्या रुग्णांची संख्या ७१८ वर पोहोचली आहे़ तसेच बालिकाश्रम रस्ता परिसरातही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून गुरुवारी करण्यात आली़ या तक्रारीची दखल घेऊन उपायुक्त बेहरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली़ दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़
शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ अस्वच्छता व दूषित पाण्यामुळे कावीळ रोगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे़ दिवसेंदिवस काविळीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, उपाय योजनाही हाती घेण्यात आल्या आहेत़ मात्र काविळीवर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला अपयश येत आहे़घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे़ पिण्याचे पाणी तपासणे, हॉटेलमधील कामगारांचे आरोग्य तपासणी करणे, साथ रोग असल्यास रूग्णांवर जागेवरच उपचार करणे,यासारख्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी गळतीची शोध मोहीम हाती घेतली आहे़तक्रार प्राप्त झाल्यास परिसराची पाहणी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले़