आंतरजातीय विवाहासाठी ६६ लाखांचे अनुदान
By Admin | Updated: June 26, 2023 11:30 IST2014-05-12T00:32:34+5:302023-06-26T11:30:44+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.

आंतरजातीय विवाहासाठी ६६ लाखांचे अनुदान
अहमदनगर : समाजातील जातीभेदाची कडी नष्ट व्हावी, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. गत वर्षी जिल्हा परिषदेने १४६ जोडप्यांचे योजनेसाठी प्रस्ताव मंजूर केले असून त्यापोटी ६६ लाख ३५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. समाजाला जातीची कीड लागलेली आहे. सवर्ण आणि मागासवर्गीय अशी भेदाभेदी सुरू आहे. ही भेदाभेदी नष्ट करण्यासाठी शासन पातळीवरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळत असली तरी समाजात अद्यापही त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने दरवर्षी आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात येतो. पूर्वी आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना १५ हजार रुपये प्रमाणे लाभ देण्यात येत होता. यात दोन वर्षापासून वाढ करण्यात येत आहे, ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १५ हजार प्रमाणे लाभ मिळविणारे १९ जोडपे असून ५० हजार रुपये प्रमाणे लाभ मिळविणारे १२७ जोडपे आहेत. यांना ६६ लाख ३५ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहेत. आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांत खुल्या प्रवर्गातील ९१, एससी प्रवर्गातील ६३, एसटी प्रवर्गातील १८, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील २८, विमा प्रवर्गातील ४० तर विजभज प्रवर्गातील ५२ जणांचा समावेश असल्याची माहिती समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी दिली. (प्रतिनिधी) तालुकानिहाय लाभ मिळणारे लाभार्थी: अकोले ११, पारनेर ४, पाथर्डी १, श्रीगोंदा ३, राहुरी ५, राहाता ९, शेवगाव ४, जामखेड १२, कोपरगाव ८, नेवासा ५, संगमनेर १२, नगर ६५ आणि कर्जत २ अशा १४६ जोडप्यांचा समावेश आहे.