४८ ग्रामपंचायतींसाठी ३७७ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:58+5:302021-01-15T04:18:58+5:30
शेवगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तालुक्यातील ४८ ...

४८ ग्रामपंचायतींसाठी ३७७ उमेदवार रिंगणात
शेवगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार असून ३७७ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १५२ मतदान केंद्र असून ७६० अधिकारी व कर्मचारी आदी यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली.
तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव, बक्तरपूर, निंबेनांदूर, मजलेशहर, शेकटे बु., लखमापुरी, सुकळी, कोळगाव, हसनापूर, सोनविहीर, शिंगोरी, कोनोशी, अधोडी, खुंटेफळ, बोडखे, दादेगाव, ताजनापुर, गायकवाड जळगाव, कांबी, वाडगाव, नागलवाडी, सुलतानपूर बु., भावीनिमगाव, भातकुडगाव, नविन दहिफळ, जुने दहिफळ, राणेगाव, अंतरवाली बु., अंतरवाली खुर्द, चेडेचांदगाव, ढोरजळगावने, आखतवाडे, तळणी, दहिगावशे, गदेवाडी, हातगाव, ढोरजळगावशे, आव्हाणे खुर्द, बेलगाव, चापडगाव, घोटण, मळेगावशे आदी गावात निवडणूक होणार आहे.
एका मतदान केंद्रावर चार मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलीस असे एकूण सहा कर्मचारी राहणार आहेत. १८ फिरते पथक, मतदान यंत्रात काही तांत्रिक अडचण आली तर त्यासाठी २६ यंत्र राखीव ठेवण्यात आले आहेत. ८ झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी विविध गावांच्या मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. दुपारी बाराच्या सुमारास कर्मचारी मतदान साहित्य घेऊन नेमणूक दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले. कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी एसटी बससह खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
दक्षतेच्या दृष्टीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानावेळी फिजिकल डिस्टन्सिंग ठेऊन तोंडाला मास्क बांधणे आवश्यक आहे. मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक पुराव्यासह काही क्षण मास्क काढावा लागणार आहे.
-अर्चना पागिरे,
तहसीलदार, शेवगाव