जिल्ह्यात १६ हजार मेट्रिक टन धान्य दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:34+5:302021-04-23T04:22:34+5:30
अहमदनगर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यातील रेशन कार्डवरून मोफत धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. ...

जिल्ह्यात १६ हजार मेट्रिक टन धान्य दाखल
अहमदनगर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यातील रेशन कार्डवरून मोफत धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. दोन महिन्यांसाठीचे धान्य एकाचवेळी वाटप केले जाणार आहे. त्यापैकी एका महिन्याचे १६ हजार मेट्रिक टन धान्य मोफत दिले जाणार आहे, तर एक महिन्याचे धान्य प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशन कार्डधारकांना खरेदी करावे लागणार आहे. गहू, तांदूळ सर्वांना तर काही तालुक्यांत नियमित वाटपाप्रमाणे मका व ज्वारी मिळणार आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात गोरगरीब, गरजूंचे हाल होणार नाहीत, यासाठी त्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थींना देण्यासाठी गहू, ज्वारी, तांदूळ, मका असे धान्य आले आहे. त्यापैकी गहू आणि तांदूळ मोफत मिळणार आहेत. एप्रिल आणि मे अशा दोन्ही महिन्यांचे धान्य एकाचवेळी वाटप होणार आहे. त्यातील एका महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे. हे धान्य वितरित करण्याची व्यवस्था स्वस्त धान्य दुकानांमधील पॉस मशीनवर उपलब्ध करण्यात आली आहे.
---------
दोन महिन्यांचे धान्य एकत्रित वाटप करण्यात येणार असून, त्यापैकी एका महिन्याचे धान्य मोफत मिळणार आहे. एप्रिलसाठी मका व ज्वारी उपलब्ध असून ते प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थींना नेहमीप्रमाणे विकत देण्यात येईल. मे महिन्याचे गहू, तांदूळ हे धान्य सरसकट मोफत दिले जाईल.
-जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी
-----------------
मोफत धान्य वाटप
गहू- ९ हजार मेट्रिक टन
तांदूळ- ७ हजार मेट्रिक टन
--------
असे आहेत कार्डधारक
अंत्योदय - ८८६१८
प्राधान्य कुटुंब योजना -६,०५,५२४
एकूण -६, १४, १४२
-----------------
मिळणारे धान्य
अंत्योदय- ३५ किलो (प्रतिकार्ड)
प्राधान्य कुटुंब- ५ किलो (प्रतिव्यक्ती)
------
फोटो - २२ गहू