चार बुकी चालवितात १५० अड्डे
By Admin | Updated: October 17, 2016 01:10 IST2016-10-17T00:45:18+5:302016-10-17T01:10:20+5:30
अरुण वाघमोडे , अहमदनगर शहरासह उपनगरात सद्यस्थितीला १५० पेक्षा जास्त मटकाअड्डे खुलेआम सुरू असून, ओपन-क्लोजच्या या खेळात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे़

चार बुकी चालवितात १५० अड्डे
अरुण वाघमोडे , अहमदनगर
शहरासह उपनगरात सद्यस्थितीला १५० पेक्षा जास्त मटकाअड्डे खुलेआम सुरू असून, ओपन-क्लोजच्या या खेळात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे़ चार बुकींच्या माध्यमातून चालणाऱ्या या अड्ड्यांकडे पोलिसांनी मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे़
शहरातील प्रत्येक भागात ठराविक ठिकाणी मटका अड्डे चालविले जातात़ मटका चालकांनी आपले परिसरही ठरवून घेतलेले आहेत़ मटक्याचा चटका लागलेले अनेक जण या अड्ड्यांवर वेळेत पोहोचतात़ यामध्ये तरुणांची संख्या मोठी असून, सर्वसामान्यांसह श्रीमंतांच्या घरातील मुलेही मटक्याच्या आहारी गेलेले दिसत आहेत़ अड्ड्यांवर सकाळी आणि सायंकाळी आकडे घेतले जातात़ दहा रुपयांपासून ते १ लाखापर्यंत आकड्यांवर पैसे लावले जातात़ साडेतीन ते चार तासांनी या आकड्यांचा आॅनलाईन निकाल जाहीर होतो़ शहरात कोणत्या ठिकाणी मटका खेळला जातो हे सर्वश्रुत आहे़ पोलिसांना मात्र, हे अड्डे दिसत नाहीत हे विशेष़ आठ दिवसांतून एखादी कारवाई करत पोलीस मटका खेळविणाऱ्यास अटक करतात़
अटक झालेल्या आरोपीस पोलीस ठाण्यातच जामीन देण्याची तरतूद असल्याने तो दुसऱ्याच दिवशी बाहेर येऊन पुन्हा आकड्यांचा खेळ सुरू करतो़ त्यामुळे मटक्याचा हा खेळ शहरात दिवसेंदिवस चांगलाच फोफावत आहे़ शहरातील चितळे रोड, तेलीखुंट, माळीवाडा बसस्थानक, कोठला, तारकपूर, पाईपलाईन रोड, एकविरा चौक, सारसनगर, सिद्धार्थनगर, बोल्हेगाव, नागापूर, एमआयडीसी, सह्याद्री चौक, बुरूडगाव रोड यासह विविध ठिकाणी मटका अड्डे चांगलेच तेजीत आहेत़
नगर शहरात चार बुक ींच्या माध्यमातून मटका अड्डे चालविले जातात़ अड्डे चालविणारे एजंट आकडा लावणाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना एक पावती देतात़ त्या पावतीवर ज्या आकड्यांवर पैसे लावले ते नंबर असतात़ निकाल जाहीर झाल्यानंतर ज्यांचा आकडा निघाला त्यांना पैसे दिले जातात़ उर्वरित रक्कम बुकींकडे दिली जाते़ यामध्ये एजंटाला कमिशन ठरवून दिलेले असते़ या बुकींचे मुंबई व ठाण्यातून नियंत्रण केले जाते़