चिनी मांजाच्या १४१ चक्री वनविभागाकडून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:09+5:302021-01-13T04:54:09+5:30
गुरुवारी मकरसंक्रातीचा सण आहे. या सणाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविला जातो. चिनी मांजा पर्यावरणास घातक आहे. त्यामुळे ...

चिनी मांजाच्या १४१ चक्री वनविभागाकडून जप्त
गुरुवारी मकरसंक्रातीचा सण आहे. या सणाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविला जातो. चिनी मांजा पर्यावरणास घातक आहे. त्यामुळे या मांजा वापरावर शासनाने बंदी घातलेली आहे. असे असूनही विक्रेते चोरट्या पद्धतीने मांजा विकत आहेत. याबाबत वनविभागाने मंगळवारी नगर आणि नेवासा तालुक्यात नायलॉन मांजाविरोधात कारवाई केली. नगर शहरातील ए वन पतंग सेंटर (मनोज देवीचंद रोडा, आनंदी बाजार), बालाजी पतंग सेंटर (संजय किसनराव पेगडवाल (श्रमिकनगर, सावेडी), परदेशी बंधू पतंग स्टॉल (राकेश उमरावसिंग परदेशी, तोफखाना), ज्योती काइटस् (विजया सदानंद पेत्राम, बागडपट्टी), ज्योती काइटस् (साईनाथ सदानंद पेत्राम, बागडपट्टी) या पतंग विक्रेत्यांवर वनविभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत चिनी बनावटीचा मांजा जप्त केला आहे.
उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहायक वनसंरक्षक एस.आर. पाटील याच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, वनाधिकारी ए. बी. तेलोरे, डी. के. पातारे, एम. एस. जाधव, एस. एल. शिंदे, ए. एम. शरमाळे, एस. एम. जगताप, के. एस. साबळे, एस. ए. काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चिनी मांजामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पक्षी जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहेत. याची दखल घेत, वनविभागाने ही कारवाई केली. हा मांजा कोणीही वापरू नये. त्याचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशा इशारा वनविभागाने दिला आहे.
---
फोटो- १२ वनविभाग
चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेला मांजा, समवेत वन विभागाचे अधिकारी.