इच्छाशक्तीच सर्वकार्याची जननी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 09:39 IST2020-02-03T09:38:53+5:302020-02-03T09:39:20+5:30
आत्मसाधना, समाजसुधारणा, राष्ट्रनिर्माण वा विश्वकल्याण करण्याची इच्छा निर्माण व्हावी.

इच्छाशक्तीच सर्वकार्याची जननी
- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)
कुठल्याही कार्याचा आरंभ चांगला व्हावा म्हणजे अर्धे काम चांगले होते. इंग्रजीमध्ये पण एक म्हण आहे ‘वेल बिगन इज हाफ इन’ आपण जे काम करतो ते विचारपूर्वक करावे. योजनाबद्ध करावे. विश्वासाने करावे. इच्छाशक्ती दृढ ठेवावी. कारण इच्छाशक्ती प्रबल असली की अशक्य ते शक्य होते. इच्छाशक्ती ही आत्मशक्तीची एक बाजू आहे. इच्छा आत्म्याची अद्भुत शक्ती आहे. इच्छा आत्मसिद्धी असून, सर्व शक्तींची जननी इच्छाशक्ती असते. जीवनात इच्छा नसेल तर कुठलेच कार्य होत नाही. इच्छाशक्ती रिद्धी-सिद्धीचे निवासस्थान आहे.
सुसाधना असो वा आत्मशक्ती मिळवण्याची कामना असो, सर्वकाही इच्छेनुसारच घडते. इच्छाशक्ती दांडगी पाहिजे. ज्ञान-विवेक-विज्ञान, साधना दूरदृष्टी सर्व इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. उदारता, सहानुभूती, सदाचार, संयम, निर्मलता, शालीनता या सर्व गोष्टी इच्छाशक्ती प्रबळ असल्यावरच सिद्ध होतात. विविध रूपे धारण करायची असेल तर इच्छाशक्ती महत्त्वाची असते. जीवन उंचवायचे असेल तर इच्छाशक्ती मजबूत ठेवा. आपली मती सर्वोत्कृष्ट ठेवायची तर इच्छाशक्ती प्रफुल्लित ठेवा म्हणजे आपले कार्य सफल होईल. समाजात विजय प्राप्त करावयाचा असेल तर इच्छाशक्ती दृढ ठेवून कार्याला प्रारंभ करा. इच्छाशक्ती सर्व यशाची गुरुकिल्ली आहे.
आत्मसाधना, समाजसुधारणा, राष्ट्रनिर्माण वा विश्वकल्याण करण्याची इच्छा निर्माण व्हावी. त्यानुसार कामाला प्रारंभ करावा. मग त्याची दिव्यता अलौकिक असते. आपला आत्मविश्वास उंचावतो. इच्छाशक्तीच सफलतेचे रहस्य आहे. आपल्याला कुठल्याही कार्यात विजयमाला घालून घ्यायची असेल तर इच्छाशक्तीच महत्त्वाची भूमिका निभावू शकते. समाजात प्रेरणादायी, विचारवंत राष्टÑपुरुष यांची इच्छाशक्ती अफाट होती. त्यामुळेच त्यांच्या आचरणाकडे बघून स्फूर्ती मिळते. त्यांचे विचार बघून आपली जिद्द वाढते. इच्छाशक्तीच सर्वकार्याची जननी आहे. ती प्रबल ठेवा व जीवन यशस्वी करा.