Where is Mathura? | कोठे मथुरा?
कोठे मथुरा?

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी संवाद साधणे ही सज्जन माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ती त्यांनी भागविलीच पाहिजे तरच समाजात सज्जन माणसांचा सुकाळ होईल. दुसऱ्या बाजूला या देशातील काही तीर्थक्षेत्रे आपल्या स्थान महात्म्याविषयी प्रसिद्ध आहेत म्हणूनच कबिराने म्हटले होते -
चलों मन गंगा जमुना तीर, गंगा-जमुना निर्मल पानी
शीतल होत शरीर ऽ चलो मन गंगा जमुना तीर ।
शरीराला शीतलता व मनाला शांतता देणारे निर्मल स्रोत म्हणून तीर्थक्षेत्राचे महत्त्व मान्य जरी केले तरी हल्ली तीर्थाटने माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. आपल्या देशातील बरीचशी मंडळी तीर्थाटनात कर्मकांड करण्यात गुंतली आहेत. पापक्षालनासाठी व मोक्षाच्या प्राप्तीसाठी आम्ही तीर्थात जाऊन वरून कातडी धूत आहोत, पण वरून कातडी धुतल्यानंतर आतून केलेले पाप धुऊन जाते हा प्रकारच हास्यास्पद वाटतो. म्हणूनच देहू गावचे धगधगते चालते ज्ञानबिंब तुकोबारायांनी एक विवेकवादी प्रश्न विचारला होता -
जाऊनियां तीर्था काय तुवा केले ?
चर्म प्राक्षाळीले वरी-वरी ।
आंतरिचे शुद्ध कासयाने झाले ?
भूषण त्वा केले अपण पया ।
तीर्थाटनात जाऊन दाढी आणि डोके भादरून घेणाºया मंडळींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी मनात विवेक निर्माण होत नाही की, अंतरंगात जर पापाची कोडी भरली असेल तर वरून दाढी करून काय करायचे? वरून कातडी धुतल्यानंतर आतले मन कधी शुद्ध होत नाही, त्यापेक्षा मथुरा, द्वारका, काशी ही सारी तीर्थक्षेत्रे आपण आपल्या मनातच निर्माण करायची आहेत. तर सद्, चित् आनंदाची अनुभूती मिळायला वेळ लागणार नाही.
- प्रा. शिवाजीराव भुकेले


Web Title: Where is Mathura?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.