स्वतःतल्या रावणाचे दहन केव्हा करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:25 PM2023-10-21T12:25:43+5:302023-10-21T12:25:50+5:30

आपण बघत असतो की आजकाल बहुतांश लोक भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन, कामचुकार आणि व्यसनांमध्ये गुरफटलेले असतात. बेइमानीने अमाप संपत्ती जमवली जाते.

When will you burn Ravana in yourself? | स्वतःतल्या रावणाचे दहन केव्हा करणार?

स्वतःतल्या रावणाचे दहन केव्हा करणार?

दसरा सणाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गावोगावी व प्रत्येक शहरात रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. दरवर्षी दसरा सणाच्या दिवशी रावणाचे भले मोठे पुतळे उभारून, फटाक्यांची आतषबाजी करून रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. परंतु जे लोक रावणाच्या पुतळ्यांचे दहन करण्यासाठी पुढाकार घेतात आणि ज्यांच्या हस्ते रावणाचे दहन केले जाते ते सगळे लोक खरोखरच नेक, इमानदार, चारित्र्यवान, प्रामाणिक असतात का? चांगल्या विचारांचे आणि शुद्ध नीतीचे असतात का? 

आपण बघत असतो की आजकाल बहुतांश लोक भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन, कामचुकार आणि व्यसनांमध्ये गुरफटलेले असतात. बेइमानीने अमाप संपत्ती जमवली जाते. गोरगरिबांचे शोषण करायचे, जातीयता पाळायची, धर्मांधता बाळगायची, कट-कारस्थान करायचे, मोठ्या पगाराची नोकरी असली तरीही वरकमाईसाठी लाच मागायची, वरकमाईतून चंगळवादी जीवन जगायचे, जीवनात ऐश करायची.. हे सर्रास सुरू आहे. काल्पनिक रावणाचे पुतळे जाळून क्षणाचा आनंद मिळतो, पण स्वतःमध्ये दडलेला दुर्गुणी रावण आपण केव्हा जाळणार आहोत? आपल्यामध्ये असलेला अहंकार, संपत्तीचा मोह, हेवा, मत्सर आणि वासना यांचेही दहन करा. मदिरा, सिगारेट, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे अमाप नुकसान होत असते. हे लक्षात घेऊन रावणाच्या पुतळ्याबरोबर आपले व्यसनही कायमचे जाळून टाका. रावणाच्या पुतळ्यांसंगे आपल्या अंगी भिनलेली भ्रष्टाचाराची व लाच घेण्याची कुप्रवृत्ती कायमची दहन करा. 

दरवर्षी दसरा सणाच्या दिवशी रावणाचा पुतळा उत्स्फूर्तपणे जाळायचा, आनंद व्यक्त करायचा आणि घरी परतताना मात्र स्वतःमधला रावण तसाच जिवंत ठेवायचा. याला काय अर्थ? त्यापेक्षा प्रत्येकाने काल्पनिक रावणाचे पुतळे जाळण्यापेक्षा स्वतःमधला दडलेला रावण जाळून टाकला तर सगळे चांगले होईल. समाजात व देशात शांतता नांदेल. आपण सगळे माणूस बनून गुण्यागोविंदाने जीवन जगत राहू. यावर्षी दसऱ्याला आपण स्वतःमधला रावण जाळू. आपण ते करू. नक्की जमेल आपल्याला.
- बबन दामोदर गुळवे, उमरगा कोर्ट, ता. अहमदपूर, जि. लातूर

Web Title: When will you burn Ravana in yourself?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा