पितृपक्ष भाद्रपद वद्यातच का?... काय सांगतं शास्त्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 14:56 IST2018-09-25T14:54:00+5:302018-09-25T14:56:56+5:30
श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. व्यक्तीच्या मृत्यूनंतरही जागृत असणाऱ्या वासना अंशतः तृप्त करण्याचा प्रयत्न म्हणजेही श्राद्ध होय.

पितृपक्ष भाद्रपद वद्यातच का?... काय सांगतं शास्त्र?
पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. व्यक्तीच्या मृत्यूनंतरही जागृत असणाऱ्या वासना अंशतः तृप्त करण्याचा प्रयत्न म्हणजेही श्राद्ध होय.
पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. सूर्य कन्या राशीत गेल्यावर १५-१६ दिवस सलग श्राद्ध करावे किंवा भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत वृद्धितिथी धरून सोळा श्राद्ध होतात. म्हणजे, पितृपक्षात सर्वही दिवस 'महालय' (श्राद्धकर्म) करावा, असे शास्त्रवचन आहे. अलीकडच्या काळात या कर्मात बदल होऊन किमान व्यक्तीच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी तरी 'महालय' करावा असा प्रघात आला आहे.
महालयाकरिता भाद्रपद वद्य पक्षच का ठरवला, अशी शंकाही नेहमी उपस्थित केली जाते. त्याचे कारण पुढीलप्रमाणे देण्यात येते - पूर्वी अश्विन महिन्यापासून वर्षारंभ होत असे आणि भाद्रपद अखेरीस वर्ष समाप्त होत असे. वर्षाच्या शेवटी पितरांच्या तृप्तीकरिता एक श्राद्ध करण्याची प्रथा सुरू झाली. तीच आजही सुरू आहे. नंतर कालौघात वर्षारंभ चैत्रात करण्याची परंपरा सुरू झाली, पण महालय भाद्रपद कृष्ण पक्षातच राहिला. म्हणूनच मृत पावलेल्या आपल्या आप्तेष्टांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा पितृपक्ष आजपासून सुरू झाला आहे.
संकलनः सुमंत अयाचित