Vision as such | ‘दृष्टी तशी सृष्टी’प्रमाणेच आशादायक चित्रं पाहायला काय हरकत?
‘दृष्टी तशी सृष्टी’प्रमाणेच आशादायक चित्रं पाहायला काय हरकत?

- रमेश सप्रे
‘झाडातला माणूस’ नावाची गोष्ट स्वामी विवेकानंद अनेकवेळा सांगत. वरवर साध्या वाटणा-या या गोष्टीत खूप अर्थ लपलेला असे. गोष्ट अशी- संध्याकाळची वेळ. धूसर प्रकाश. दूर अंतरावरच्या गोष्टी स्पष्ट दिसत नव्हत्या. नुसती त्यांच्या आकाराची रूपरेषा दिसत होती. एका बागेच्या दुस-या टोकाला एक माणूस उभा होता. आपल्या छातीशी एक गाठोडं घट्ट धरून एकजण वेगात पळत बागेत आला. बागेच्या त्या कोप-यात उभ्या असलेल्या त्या माणसाला त्यानं पाहिलं आणि जिवाच्या आकांतानं तो दुस-या दिशेने पळून गेला.

काही वेळानं एक तरुणी तिथं आली, त्या दूर उभ्या असलेल्या माणसाकडे लक्ष जाताच तिनं मनगटातल्या घड्याळाकडे पाहिलं अन् त्या माणसाच्या दिशेनं झपझप पावलं टाकत गेली. तिथं पोहोचल्यावर काही वेळ रेंगाळली. नंतर संथगतीनं तिथून दूर गेली. नंतर तिथं एक भगवी कफनी घातलेले, हातात कमंडलू घेतलेले एक साधूबुवा आले, त्यांनीही दूरवरून त्या बागेच्या कोप-यात उभ्या असलेल्या माणसाकडे पाहिलं. ते शांतपणे त्या माणसाजवळ गेले. इकडे तिकडे पाहून सावकाश तिथं बसले नि ध्यानस्थ झाले. ही सारी दृष्यं पाहणारे एक आजोबा बाकावर बसले होते. त्यांनाही तो दूरचा माणूस दिसत होता; पण या तीन व्यक्तींच्या तीन वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहून ते उठले नि स्वत: त्या माणसाच्या दिशेनं निघाले. कुतूहलानं पाहतात तो त्यांना दिसलं की प्रत्यक्षात तो माणूस नसून हुबेहूब माणसासारखा दिसणारा झाडाचा बुंधा होता. विचार करू लागल्यावर आजोबांच्या लक्षात सारा प्रकार आला.

पहिली व्यक्ती चोर असावी. चोरीच्या मालाचं गाठोडं छातीशी धरून पळताना त्याला ती माणसासारखी दिसणारी आकृती पोलीस वाटली म्हणून विरुद्ध दिशेनं तो वेगात पळून गेला. दुसरी तरुणी ही प्रेमात पडलेली असावी. आपला प्रियकर आपल्या आधी पोचलाय हे पाहून ती वेगानं त्या दिशेनं गेली नि तो माणूस नसून झाडाचा बुंधा आहे हे लक्षात येताच काही वेळ थांबून निघून गेली. तिसरे साधुबुवा मात्र शांतपणे त्या माणसाच्या दिशेनं गेले. ते एक झाड आहे हे लक्षात येताच आनंदानं तिथं बसून त्यांनी आपली सायंउपासना सुरू केली.

हे सांगून, स्वामी विवेकानंद विचारत - हे असं का झालं? माणसासारखी आकृती असलेला तो झाडाचा बुंधा होता. धुसर प्रकाशामुळे त्या आकृतीत माणूस दिसला इथर्पयत ठीक होतं पण त्या चोराला त्यात पोलीस दिसणं, त्या तरुणीला त्यात आपला प्रियकर दिसणं विशेष होतं. साधूला तो माणूस असला तरी हरकत नव्हती. बागेच्या कोप-यात बसून त्यांना सायंउपासना करायची होती. असे भास आपल्याला नित्य होत असतात. ‘दिसतं तसं नसतं’ याचा अनेकदा अनुभव येऊनही आपण आपल्या मनातले विचार, कल्पना, तर्क, पूर्वग्रह बाहेरची परिस्थिती, इतर व्यक्ती, त्यांचं वर्तन यांच्यावर लादून त्यांचा अर्थ लावायचा प्रय} करतो. वाईट म्हणजे आपण आपल्या प्रतिक्रिया त्यानुसार व्यक्त करतो. अन् मनात, जनात, जीवनात गैरसमज, संघर्ष, दु:ख, ताणतणाव गरज नसताना निर्माण करतो. विशेष म्हणजे त्यावर आधारीत आपलं वागणं अतिशय आग्रही, संकुचित, आत्मकेंद्री असतं.

एक गमतीदार गोष्ट सांगितली जाते, समर्थ रामदास रामायण सांगत असतात. एक वृद्ध व्यक्ती अतिशय तन्मय होऊन कथा ऐकत असते. ज्या दिवशी अशोकवनातील सीतेची अवस्था पाहून रागानं लालेलाल होऊन हनुमान अशोकवनाचा विध्वंस करतो हे कथानक रंगवून सांगितलं गेलं त्या दिवशी ती वृद्ध व्यक्ती समर्थ रामदासांना म्हणाली, ‘अप्रतिम कथा सांगितलीस; पण एक चूक झाली. अशोक वनातील फुलं पांढरी नव्हती तर तांबडी होती.’ समर्थ म्हणाले, ‘नाही, पांढरीच होती.’ दोघांचा वाद श्रीरामांसमोर गेला. श्रीराम म्हणाले, ‘दोघंही बरोबर  आहात. ती फुलं पांढरी शुभ्रच होती; पण हनुमंताचे डोळे रागानं लाल झाल्यामुळे त्याला ती तांबडी दिसली.’

किती खरंच आहे! कावीळ झालेल्या व्यक्तीला सा-या गोष्टी पिवळ्या दिसतात. इतकंच काय पण आपण आपल्या डोळ्यावरच्या चष्म्याचा रंग बदलला की बाहेरच्या सगळ्या वस्तू आपल्याला त्या त्या रंगाच्या दिसू लागतात. रस्त्यावरील खांबाला लटकलेल्या पतंगात त्याच्या आकारामुळे नि खाली लोंबणा-या कागदाच्या झिरमिळ्यामुळे लहान मुलांना लांब दाढी असलेलं भूत दिसतं नि ती घाबरतात. अंगणात वाळत घातलेली बाबांची पॅँट नि सदरा आणायला रात्रीच्या अंधारात सदू घाबरतो. कारण त्यात हलणा-या पँटचे पाय नि सद-याचे हात पाहून त्याला भुताचा भास होतो. हातात टॉर्च दिल्यावर त्याच्या प्रकाशात त्याच्या मनातलं भूत जातं नि कपडे दिसतात.

अशी भुतं मनातच असतात. आपण त्यांना बाहेरच्या वस्तूंवर पाहतो नि भितो. भविष्यात घडणा-या घटना आपल्याला आज दिसत नाहीत. आपण चिंता, भय, काळजी, अशा नकारात्मक कल्पना करून आज उगीचच धास्तावतो. यामुळे आपला आज, म्हणजेच आपला वर्तमानकाळ आपण नासवतो. कारण नसताना दु:खी उदास बनतो. ‘दृष्टी तशी सृष्टी’ हे जर खरं आहे तर आपण सदैव सकारात्मक, आशादायक चित्रं पाहायला काय हरकत आहे? भविष्यात उज्ज्वल चित्रं पाहण्याचा संकल्प आत्ताच करू या. 

Web Title: Vision as such

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.