' लक्ष्मी' या शब्दाचा खरा अर्थ 'लक्ष कमी' असा असावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 14:04 IST2019-01-07T13:57:23+5:302019-01-07T14:04:08+5:30
ही देवता किती जरी प्राप्त झाली तरी त्याच्या मनाचे समाधान होत नाही.

' लक्ष्मी' या शब्दाचा खरा अर्थ 'लक्ष कमी' असा असावा !
हिंदू संस्कृती मध्ये लक्ष्मी या देवतेला अत्यंत पूज्य व महत्त्वाची देवता मानले जाते. दिपावली मध्ये तर लक्ष्मी पूजनाचे अत्यंत महत्त्व आहे. ही देवता प्रसन्न व्हावी म्हणून अनेक जण वाटेल ते कर्मकांड करायला तयार असतात. लक्ष्मी प्रसन्न असावी, तिची कृपा आपल्या घरावर, कुटुंबावर रहावी, म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक सुवासिनी दर गुरुवारी उपवास करून, विधीवत मनोभावे लक्ष्मीची आराधन करतात. लक्ष्मी प्रसन्न असणारा व्यक्ती अत्यंत सुखी, समाधानी तसेच नशिबवान समजला जातो. या देवतेला प्रसन्न करण्यासाठी तसेच ती प्राप्त करण्यासाठी व्यक्ती काहीही करायला तयार असतो.
धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने या गोष्टींना आपण लक्ष्मीचे प्रतिक मानतो. तसेच घराचा सर्व कारभार बघणाऱ्या घरातील स्त्रियांना आपण लक्ष्मीच संबोधतो. आजच्या काळात तर या देवतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ही देवता ज्याच्यावर प्रसन्न असेल, त्याच्या मागे सर्व जग धावते. तसे बघितल्यास खरंच लक्ष्मी प्रसन्न असल्यावर व्यक्ती सुखी समाधानी असतो का ? लक्ष्मी चा खरा अर्थ काय ? तो जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न केला का ?
खरे तर लक्ष्मी या शब्दाचा अर्थ “ लक्ष कमी ” असा असावा. कारण व्यक्ती धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने यांना लक्ष्मी मानतो. ही देवता किती जरी प्राप्त झाली तरी त्याच्या मनाचे समाधान होत नाही. मनःशांती त्याला मिळत नाही. गरजे पेक्षा जास्त लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर ती ठेवावी कुठे ? तिची चोरी तर होणार नाही ना ? या संपत्ती मुळे स्वतःच्या जीवाला, कुटुंबाच्या जीवाला धोका तर नाही ना ? असे असंख्य प्रश्न व्यक्तीच्या मनात निर्माण होतात. ज्या मनःशांतीसाठी तो वाटेल त्या नैतिक – अनैतिक मार्गाने लक्ष्मीला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. ती प्राप्त झाल्यानंतर मनःशांती त्याला कुठेच दिसत नाही. उलट दिसते ती भीती, काळजी आणि चिंता.
व्यक्तीला जर हे समजले की; तो ज्या गोष्टींना म्हणजेच धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने यांना लक्ष्मी मानतो, त्या गोष्टींन कडे लक्ष कमी द्यायला हवे. या गोष्टी प्राप्त झाल्या नंतर त्याला मनःशांती मिळणार नाही. मिळेल ती फक्त चिंता, काळजी आणि भीती. संपत्तीचा अती हव्यास केल्याने व्यक्ती स्वतःपासून दूर जातो. ही लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी, नंतर ती लपवण्यासाठी, तो वाटेल ते करतो. कारण मनात अनेक प्रश्न असतात. हे प्रश्नचं व्यक्तीला शांत झोपू देत नाहीत. मग ही झोप येण्यासाठी तो झोपेच्या गोळ्या घेतो, व्यसनाच्या आहारी जातो. यातूनच तो स्वतःची व कुटुंबाची मनःशांती हरवून बसतो.
म्हणूनच लक्ष्मी या शब्दाचा अर्थ समजून घेतांना हे लक्षात घेतले पाहिजे की, धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने या गोष्टींकडे लक्ष कमी दिल्यास व गरजे पुरते धन मिळवल्यास व्यक्तीला समाधान मिळू शकते. परंतू आजच्या भोगवादी संस्कृतीमध्ये एवढा विचार करायला व्यक्तीजवळ वेळ नाही. लक्ष्मीच्या हव्यासापोटी तो नातीगोती विसरू लागला आहे. एकमेकांची हत्या करण्यास त्याला काहीच वाटतं नाही. निष्ठूर मनाचे जग तो तयार करू पाहतोय. ते ही कशासाठी तर मनःशांतीसाठी. निष्ठूर मनाचे जग तयार झाल्यावर ही मनःशांती राहणारच नाही. हेच त्याला समजेनासे झाले आहे. म्हणून मनःशांती हवी असेल तर धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने यावरील लक्ष कमी केले पाहिजे. तरच व्यक्ती सुखी आणि समाधानी होऊन त्याला मनःशांती मिळेल व तो आत्म सुखाच्या मार्गावर पाऊल ठेवेल.
- सचिन व्ही. काळे, जालना ( ९८८१८४९६६ )