चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:38 AM2020-04-27T02:38:25+5:302020-04-27T02:38:32+5:30

याचसाठी आमचे तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात,

Though pure in mind ... | चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...

googlenewsNext

- इंद्रजित देशमुख
शुद्ध परमार्थ करण्यासाठी आवश्यक असणारं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे चित्ताची शुद्धता हे होय. ही एक गोष्ट आम्ही आमच्या
अंतरी धारण केली की, बोध नावाची गोष्ट पक्की व्हायला काहीच अडचण नाही.
दृष्टीमध्ये येणारं सर्व तºहेचं वैषम्य कमी होण्यासाठी आणि दृष्टीत अखंड समता येण्यासाठी चित्त शुद्धी होणे गरजेचेच आहे. याचसाठी आमचे तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात,
‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।
व्याघ्र ही न खाती सर्प तया।।’
मुळात चित्ताचं मालिन्य हे पारमार्थिक
आणि सांसारिक या दोघांच्या प्रगतीसाठी मारकच असतं. अशुद्ध चित्त, द्वेष, घृणा
आणि मत्सर अशा गोष्टींच्या निर्मितीसाठी ते कारणीभूत ठरत असतं. चित्त शुद्ध नसलं की, जगातील बारीकसारीक वैगुण्यदेखील आम्हाला सहन होत नाही. जगाच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे आणि जगाच्या गुणांची कदर करणं हा शुद्ध चित्त असलेल्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा गुण आहे. अशुद्ध चित्त आपल्या भोवतालचं वैगुण्य
शोधून त्याबद्दल अतिभाष्य करतं आणि
यातूनच वेगवेगळे वाद निर्माण होतात. द्वेष आणि मत्सराच्या कल्पना वाढीस लागतात आणि आपण तसेच आपला भवताल दु:खी होतो. याउलट शुद्ध चित्त आपलं आणि इतरांचं
हितच पाहात असतं. आपलं आणि इतरांचं अस्तित्व अबाधित राहणारा विधायक विचार जोपासून तो उत्तरोत्तर संवर्धित करण्याचं कार्य शुद्ध चित्ताच्या माध्यमातून केलं जातं.
म्हणूनच आपल्या आणि इतरांच्या हितासाठी चित्त शुद्ध असणं खूपच गरजेचं आहे. आपल्या जीवनातील आपल्या चांगुलपणाच्या आग्रही भूमिकेमुळे आपलं सगळ्यांचं चित्त शुद्ध व्हावं असं मनापासून वाटतं.

Web Title: Though pure in mind ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.