Subjective happiness leads to ultimate pain | विषय सुख अंती दु:खालाच कारण ठरते 
विषय सुख अंती दु:खालाच कारण ठरते 

- हभप भरतबुवा रामदासी ( बीड )
 

जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मानव प्राणी जी कांही धडपड करत असतो ती सुखासाठीच. ..  
 मजलागी दु:ख व्हावे! ऐसे कोणी भाविना जीवे!!
सुखाची इच्छा करणे चुकीचे नाही. परंतु संसारातच सुख शोधणे चुकीचे आहे. संसार आणि सुख एकत्रित येणं म्हणजे प्रकाश आणि अंधार एकत्रित आल्यासारखेच आहे. तरीहि अविवेकी माणूस विषयांपासून सुख मिळेल, याच भ्रमात सतत वावरत असतो. त्याचा हा भ्रम कसा आहे. .माऊली सुंदर वर्णन करतात. ....
 हे असो आघवी बोली ! सांग पा सर्प फणीची सावली!  ती शितल होईल केतुली ! मूषकासी !!
नागाने उभारलेल्या फण्याच्या सावलीत उंदीर किती वेळ शांतीचा अनुभव घेईल. ती सावली उंदराला किती वेळ सुख देईल. .? अगदी तसंच संसाररूपी सर्प फणीच्या सावलीत जीव रूपी उंदीर सुख घेईल. ..? तुकाराम महाराज म्हणतात :--  
दु:ख बांदवडी आहे हा संसार! सुखाचा विचार नाही कोठे!!
संसार रूपी वृक्षाचे मूळच दु:खाचे आहे. त्याला सुखाचे फळ येईलच कसे. ? आपण म्हणाल, सुख मिळत असल्याशिवाय का कुणी उगाच संसार करील. .? संसारात नक्कीच सुख असले पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर देतांना आपण थोडे सूक्ष्म चिंतन करू....! पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच विषयांपासून जो क्षणकि सुखाचा भास होतो, तो विषयांपासून मिळणाऱ्या सुखाचा नसतो. पंच विषयांचा उपभोग घेतांना मन निश्चल झालेले असते. आणि त्या स्थिर व निश्चल मनात आपल्याच आत्म स्वरूपाचे त्याला दर्शन घडते. आत्मा हा आनंद रूप असल्याने त्याला सुखाचा स्पर्श होतो. जाणीव होते. थोडक्यात काय तर, मनाच्या स्थिरतेत सुखाची प्राप्ती आहे. विषय प्राप्तीत मनोवृत्ती क्षणिक अंतर्मुख होते व मिळणारा आनंद ही क्षणिक असतो. विवेकहीन मनुष्य या क्षणिक सुखालाच सर्वस्व समजतो. परंतु विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगातून मिळणारे सुख कसे आहे. ...माऊली वर्णन करतात :--
शरीराची वाढी ! अहो रात्रांची जोडी! विषय सुख प्रौढी! साचची मानी!! 
परी बापडा ऐसा नेणे! जे वेश्येचे सर्वस्व देणे! तेचि ते नागवणे ! रूप येथ !!

विषयात जर सुख असते तर एकच विषय एकाच वेळी सर्वांना सुखरूप वाटला पाहिजे. पण असे होतांना दिसत नाही. एकाला गोड खावयास आवडते तर दुसऱ्याला ताटात पण चालत नाही. सापाला पाहून सर्पिणीला आनंद होत असला तरी उंदराला मात्र दु:खच होते. शेवटी काय तर विषय सुख हे फसवे जाण. ...

राजा भृर्तहारीच्या जीवनातला प्रसंग बघा. त्याचे चौदा चौकड्याचे राज्य होते. ऐश्वर्याचा हिमालय होता. पण राजाला एक दु:ख होतेच. वंशाला कुलदीपक नव्हता. त्यासाठी त्याने उग्र तप केले. तप साधनेनंतर आकाशवाणी झाली. राजा थोड्याच वेळात तुझ्यासमोर एक फळ पडेल. घरी जाऊन ते फळ बायकोला खायला दे. तुला मुलगा नक्की होईल. राजाला आनंद झाला. घरी आला. बायकोजवळ फळ देऊन खावयास सांगितले. राजा दरबारात निघून गेला. पण राणीचे खरे प्रेम राजावर नव्हतेच. तिचे प्रेम त्याच नगरातल्या प्रधानजीवर होते. प्रधानाला ही मुलगा नव्हता. तिला वाटले हे फळ आपण प्रधानजीला देऊ. राजाने महत् प्रयासाने मिळवलेले पुत्र प्राप्ती करून देणारे फळ तिने  प्रधानजीला दिले. आता प्रधानाचे तरी खरे प्रेम त्याच्या बायकोवर कुठे होते. त्याचे प्रेम त्याच नगरीतल्या एका गणिकेवर होते. त्याने ते फळ गणिकेला दिले. गणिकेने विचार केला माझ्यासारख्या गलिच्छ धंदा करणाऱ्या बाईला मुलगा हवा तरी कशाला. .? तिचे राजावर खरे प्रेम होते. तिने ते फळ राजाला आणून दिले. राजाच्या हातात फळ पडल्याबरोबर राजाला सगळा वृतांत समजला आणि त्याने विभव, वैभवाचा त्याग करून अरण्याचा मार्ग धरला. विषय सुख अंती दु:खालाच कारण ठरले. माऊली म्हणतात,
हे विषय तरी कैसे! रोहिणीचे जळ  जैसे! का स्वप्नीचा आभासे ! भद्रजाती!!
देखे अनित्य ते यापरी !म्हणोनि तू अव्हेरी! हा सर्वथा संग न धरी! धनुर्धरा!!

 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467)

Web Title: Subjective happiness leads to ultimate pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.