अध्यात्मिक - शकुनी आणि चाणक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 22:12 IST2019-02-10T22:12:13+5:302019-02-10T22:12:20+5:30
जर तुलना करायची झाल्यास एकीकडे महाभारतातील विदुर, भगवान श्रीकृष्ण, मौर्यकालीन आचार्य चाणक्य व दुसरीकडे शकुनी, कणिक आदि मंडळी.

अध्यात्मिक - शकुनी आणि चाणक्य
योगेश्वर रमाकांत व्यास
महाभारतातील शकुनी या पात्राशी आपण सर्वजण परिचित आहोत. अतिशय बुध्दिमान, कूटनीतीज्ञ पण तितकाच धूर्त, कपटी व स्वार्थी. एकीकडे शकुनी हा स्वत:चा अहंभाव सांभाळण्यासाठी, स्वत:चा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी दुर्योधन, दु:शासन, कर्ण, धृतराष्ट्र यांचा चक्क वापर करत जातो. ते ही मोठ्या चलाखीने. महाभारतामध्ये जेव्हा पांडव राजसूर्य यज्ञ करतात, त्यावेळी शकुनी युधिष्ठिरादि पांडवांसोबत द्यूतक्रीडा खेळतो व मुद्दाम हरतो. जेणेकरुन आत्मविश्वास बळावलेल्या पांडवांना द्यूतक्रीडेकरिता पुन्हा निमंत्रित करुन त्यांना त्यांचे सर्वस्व हरण्यास भाग पाडावे. यासाठी पुत्रमोहामधे हतबल झालेला धृतराष्ट्र ही संमती देणारा हा शकुनिचा आत्मविश्वास. आणि कर्ण त्याचा मित्र दुर्योधनासाठी पूर्णपणे समर्पित आहे, हे धरुन याचा आपल्याला भविष्यात कुठेतरी वापर करता येईल, म्हणून त्याला नाराज करु नये. इत्यादि. या आणि अशा अनेक प्रसंगांवरुन शकुनिची चलाखी, हुशारी आणि त्याच्या कपटीपणाचे दर्शन होते.
जर तुलना करायची झाल्यास एकीकडे महाभारतातील विदुर, भगवान श्रीकृष्ण, मौर्यकालीन आचार्य चाणक्य व दुसरीकडे शकुनी, कणिक आदि मंडळी. हे दोन्हीही अतिशय कुशाग्र बुध्दिमत्ता लाभलेले, राजनीतिज्ञ व कूटनीतिज्ञ. ‘बोथ ब्रेन्स आर लाईक शार्प स्वॉर्ड’ पण दोन्ही पक्षांमध्ये एक फरक आहे. तो म्हणजे तत्त्वांचा....‘द प्रिन्सिपल्स’.
विदुर, चाणक्य आदिंच्या जीवनाकडे पाहिल्यास आपणांस सतत जाणवते, की, शकुनिसारख्या लोकांपासून सावध कसे रहावे? हे त्यांनी शिकविले. चाणक्यांबद्दल वाचताना बहुतेक लोकांच्या मनात ही भावना निर्माण होते, की आपणांस काहीतरी चलाखी, चतुराई करुन किंवा डोके चालवून अल्पकाळातच सर्व काही मिळवता येईल. पण असे समजणारे फार मोठी चूक करतात. ती ही की विदुर नीती, चाणक्य नीती इत्यादी महापुरुषांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये त्यांनी कधीही ‘शॉर्ट टाईम गेन’ आणि ‘फास्ट सक्सेस’चे फॉर्म्युले वाटलेले नाहीत. त्यांचा सर्व भर नीतीमत्ता आणि त्यांच्या तत्त्वांचे पालन करण्यावर व नीती, न्याय, सत्य व सदाचार असलेले राज्य निर्माण करण्यावरच होता.
शकुनी आणि चाणक्य या दोघांमधला नेमका फरक तो हाच. शकुनी स्वत:च्या अहंभावनेसाठी, फक्त आणि फक्त दुसऱ्याचे वाटोळे करुन त्यांचा नाश होताना पाहण्याचा मनस्वी आनंद लुटण्यासाठी, ज्याला आपण आसुरी आनंद म्हणतो, इतक्यासाठी सर्व खटाटोप करतो. आणि विदुर व चाणक्यादि महापुरुष सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी व एका नीतीमान, न्यायप्रिय व सदाचारी राजाने कसे वागावे, कसे जगावे, हे शिकवतात.
आजकाल एक समज असा होत चालला आहे, की चलाखी करणे, खोटे बोलणे, स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही थराला जाणे म्हणजेच आपण खूप बुध्दिमान आहोत. एखाद्याला फसविता आले, म्हणजे आपण किती हुशार आहोत. आणि असा खोटेपणा करुन थोड्या कालावधीकरिता मिळालेल्या त्या क्षुल्लक यशामुळे हुरळून जाऊन परत परत तीच चूक करण्याचा मोह आवरता येत नाही. आणि अनीतीच्या त्या दृष्ट्रचक्रामधे माणूस पूर्णपणे गुरफटून जातो व त्याचा स्वभाव ही तसाच बनत जातो. पण हे सर्व करताना तो एक गोष्ट विसरतो, की अंत में जीत सत्य की ही होती है. महाभारतामध्ये ही विजय सत्याचाच झाला होता. आणि नीतीच्या मार्गावर चालणाºयांचेच नाव पुढे आदराने घेतले जाते. शकुनीचे नाही.
‘मॉरल आॅफ द स्टोरी इज’-बुध्दिमान होण्याचा अर्थ हा नसतो, की कुणाचा तरी गळा कापून तुम्ही स्वत:चा हेतू साध्य करुन घ्या. बुध्दी इतकीच चालवावी, की आपल्याला कुणी फसवू नये, आपले नुकसान करु नये. आपल्या जीवनाचे जे लक्ष्य आहेत, आपल्याला जीवनामध्ये जे मिळवायचे आहे, ते सर्व नीतीला धरुन असायला हवे. आपल्या जीवन कार्याची इमारत तत्त्वांच्या भक्कम पायावर उभी रहायला हवी. काहीही झाले तरी आपण आपली तत्त्वे सोडू नये. या जगात लबाडी करुन पैसा मिळवणारे आणि ती चोरी उघडी पडल्याने वणवण फिरणारे अनेक जण आहेत. आणि प्रामाणिकपणे काम करुन मागील शंभरपेक्षाही जास्त वर्षांपासून यशाच्या शिखरावर आरुढ होणारेही लोक आहेत. आपण हे पहावे, की दोन्हींमधील चांगला मार्ग कुठला आहे? एक मार्ग कमी वेळेत यश मिळवून देऊन जेलमधे नेऊन सोडणारा आणि दुसरा खडतर, वेळखाऊ पण समाजात मान मिळवून देणारा, आपण कधी कल्पिलेही नव्हते इतके मोठे यश आपल्या ओंजळीत टाकणारा आहे.
राजकारणही करायचे असेल, तर ते तत्त्व व नीतीमत्ता सांभाळून एका आदर्श राष्ट्रनिर्माणासाठी करावे. शकुनीप्रमाणे आपल्या स्वार्थांसाठी कुणाचाही बळी घेऊ नये. आपल्या स्वार्थाच्या अग्निमध्ये कशाचीही आणि कुणाचीही आहुति देऊ नये. कारण त्याने काहीच साध्य होत नाही. मला अमुक, एकाचा नाश करायचाच आहे, मला एखाद्याचे वाईट होताना पहायचेच आहे, अशा तीव्र भावनेने शकुनी पछाडलेला होता. धर्मसंस्थापनेसाठी नाही. काय फायदा त्याच्या बुध्दिमत्तेचा? ही दुसºयाचे वाटोळे करण्याची प्रवृत्तीच विनाशकारी आहे. आणि त्यामध्ये शेवटी स्वत:चाच विनाश होतो. कारण अंत में विजय सत्य की ही होती है।
चाणक्यांनीही क धीतरी कूटनीती अवलंबिली असेल. उत्कृष्ट राष्ट्रनिर्मितीचे महान कार्य करताना त्यांना ते करावे ही लागले असेल, पण या महापुरुषांचा हेतू अतिशय शुध्द होता. इतक्या मोठ्या साम्राज्याची निर्मिती करुन चंद्रगुप्ताला राजा बनवून आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात चाणक्य सर्व काही सोडून ईशप्राप्तीसाठी वनामध्ये निघून जातात. काय ही त्यांची अनासक्ती! किती विरक्त राहून त्यांनी सर्व कार्य पार पाडले असेल!
शेवटी इतकेच सांगावेसे वाटते, की लडाई देश, धर्म, जात , पात इनकी है ही नही। लडाई है अच्छाई और बुराई की । दोन्ही आपल्या आतच आहेत. आपण कुणाला प्रबळ बनवत आहोत, ते जरा तपासून पहावे. वाईट नेहमी वाईटच असते आणि वाईटाकडेच नेऊन जाणारे असते. आता प्रत्येकाच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग वेळोवेळी येत असतात, की आकर्षक भासणारा शकुनीचा मार्ग आपल्याला प्रलोभने देत असतो आणि थोडेसे त्रासदायक पण योग्य मार्गाने नेणारे चाणक्य आपल्याला रागवत असतात. शकुनी आणि चाणक्य दोन्हीही आपल्या आतच आहेत. कुणाच्या दाखवलेल्या मार्गावर चालावे, हे आपण ठरवावे.
(लेखक भागवत निरुपणकार आहेत)