sant is reason of happiness | आनंदाचे डोही आनंद तरंग- ‘पुण्य उभे राहू आता, संताचीया कारणे...’’
आनंदाचे डोही आनंद तरंग- ‘पुण्य उभे राहू आता, संताचीया कारणे...’’

- हभप.चंद्रकांतमहाराज वांजळे - 
(प्रसिध्द प्रवचन व कीर्तनकार ) 
वारीच्या वाटेवर पावले पडण्यासाठी फार मोठी पुण्याई आपल्या ठायी असावे लागते. वारीत भक्तीचा सागर तर असतोच, त्याचबरोबर आत्मशोध घेण्याचा आणि भावभक्तीचाही हा नयनरम्य असा दिव्य सोहळा असतो. जगद्गुरू संत तुकाराममहाराजांचा एक अभंग आहे, ‘पुण्य उभे राहू आता, संताचीया कारणे...’’ संतांचे पुण्य आपल्या पाठीमागे उभे रहो, कशासाठी? तर ‘‘पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटा विठ्ठल, संकल्प ते यावे फळा, कळवळा बहुतांचा, तुका म्हणे होऊनी क्षमा पुरुषोत्तमा अपराध’’ खरे तर संतांचे संकल्प जग कल्याणाचे आहेत. ज्यांना पुढे जाणे शक्य होणार नाही. त्यांना घरबसल्याही वारी होत असते.  त्यातूनही काही अपराधी जीव असेही असतील की त्याविषयी भगवंतांनी त्यास क्षमा करावी, असे तुकोबाराय म्हणतात. पंढरीची वारीची वाट नुसती, भूगोलाची किंवा जमिनीवरची वाट नसून भक्तीची वाट आहे. संत तुकोबारायांचा याविषयीचा एक अभंग आहे. ‘शीतळ हा पंथ, माहेराची वाट...’ माहेराची वाट शीतळ आहे. अशी तुकोबारायांनी या वारीच्या वाटेची भावरम्यता सांगितली आहे. अन्य वाटा तापलेल्या आहेत. दु:खाच्या किंवा वेदनांच्या आहेत अन्य वाटा माणसाला अध:पतनास नेणाऱ्या आहेत. त्या वाटांवर काटे-कुटे आहेत. मात्र, वारीची वाट ही शीतळ आहे. कारण ती भक्तीची आणि संतांबरोबर जाण्याची आहे. संत तुकाराममहाराज म्हणतात, ‘‘उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, तुका म्हणे तुम्ही चालू याची वाटे, भेटे पांडुरंग...’’ ज्या वाटेने पांडुरंगाची भेट आहे, अशी ही वारीची वाट आहे. खरे तर आज वाट दाखविणारे कमी आणि वाट लावणारेच अधिक आहेत. संतांच्या मागे जाऊन, संतांच्या संगतीत वारी करणे यासारखे दुसरे सुख नाही. वारीची खरी दीक्षा आहे. वारीमध्ये, दीक्षा, शिक्षा आणि भिक्षा ही आहे. वारीत दीक्षा आहे, ती तुळशीच्या माळेची. तर भिक्षा आहे, ती प्रेमाची आहे. ‘गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठले...’ ही दीक्षा आहे. नामाची दीक्षा आहे. आणि शिक्षा म्हणजे मारहाण नव्हे. तर शिक्षण या अर्थाने आहे. शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास समाज जीवनाशी बोलावे कसे? सामुदायिक वातावरण ठेवावे कसे? भेदाभेद विसरून एकत्र रहावे कसे? ही शिक्षा आहे, हे शिक्षण आहे. समाजभान हे पंढरीची वारी देत असते. 


Web Title: sant is reason of happiness
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.