निरामय आनंद देणारे प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 08:00 IST2019-01-07T07:58:08+5:302019-01-07T08:00:00+5:30
मनाचे प्रतिबिंब त्याच्या बोलण्यातून प्रकट होते. मन ही कल्पनाच भयावह आहे. मनात येणारे विचार कधी कधी मनातच ठेवून आपण एखाद्या व्यक्तीवर, साधूवर, देवावर प्रेम करतोच; पण ते फक्त मनातच असतं.

निरामय आनंद देणारे प्रेम
मनाचे प्रतिबिंब त्याच्या बोलण्यातून प्रकट होते. मन ही कल्पनाच भयावह आहे. मनात येणारे विचार कधी कधी मनातच ठेवून आपण एखाद्या व्यक्तीवर, साधूवर, देवावर प्रेम करतोच; पण ते फक्त मनातच असतं. कधी कधी त्याच्या देहबोलीवरून ते प्रकट होते. किंवा त्यांच्या आंतरप्रक्रियेत सतत त्याचा गुंता असतो. तो कुणाजवळ व्यक्त करावा, याचा विचार मनातच असतो. मनातल्या मनात झुरत राहणे, त्याच्या कल्पना करणे, स्वप्नात-जागृतीत त्यालाच पाहणे, खरोखर हेच मनातले प्रेम असते का, असा विचार येऊन जातो. प्रेमात कधी संशय नसतो, तर संशयात कधी प्रेम नसते. प्रेमाचा रंग कसा, हा प्रश्न विचारल्यावर तो कुणालाही सांगता येणार नाही.
भगवान श्रीकृष्णांचे असणारे अर्जुनावरचे प्रेम- ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वरांनी प्रकट केले. अर्जुनाच्या बाबतीत श्रीकृष्ण म्हणतात, ‘अर्जुना तू प्रेमाचा पुतळा आहे. ‘प्रेमाचा पुतळा’ हे ब्रीद ज्ञानेश्वरांनी दिले. अर्जुन कधी रुसतो तरी देव त्याला समजावतात. त्याच्यावर देवाचे प्रेम किती आहे याची कल्पना येते. प्रेमात कधी स्वार्थ नसतो. स्वार्थी माणूस प्रेम करू शकत नाही. प्रेम हे निखळ झऱ्यासारखे स्वच्छ असावे. प्रेम कुणावर करतात त्यापेक्षा ते किती मनापासून करतात तेव्हाच त्याची किंमत कळते. देशावरचे प्रेम, मातृभक्तीचे, ईश्वरावरचे प्रेम, गुरुवरचे प्रेम, कुठल्याही वस्तूवर, व्यक्तीवर, समाजावर प्रेम करा. पण मनातले प्रेम निरामय आनंद देणारे असते. प्रेमाची शक्ती अद्भुत असते, अद्वितीय प्रेम एकरचनेत समावते. प्रेमात मन एक असते, व्यक्ती दोन. ‘भक्तिप्रेमावीण ज्ञान नको देवा’ असे संतांनी म्हटले आहे. गोपींचे श्रीकृष्णावरचे प्रेम निष्काम व निराळे होते. प्रेमात अनुभूती असते. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम कुणाचेही असो, त्याची प्रचिती त्याला येते. विचारांचे तरंग प्रेमामुळे निर्माण होतात. मनाचे आविष्कार प्रेमात पाहायला मिळतात. आनंदी मन प्रेमात सापडते. दु:खी मन विरहात सापडते. ज्या मनाचा जसा विचार आहे, तसे त्याचे वैभव असते. प्रेमाच्या अंगी शक्ती अद्भुत असते; पण त्याचे प्रात्यक्षिकीकरण मनात होते. मनाने एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे ‘मनातले प्रेम’ असे समजणे होय. प्रेमात व्यक्त होणे किंवा अव्यक्त राहणे- हेच मनातले प्रेम असते.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)