Parents are the first gurus! | आई-वडील हेच पहिले गुरू!

आई-वडील हेच पहिले गुरू!

अनेक जन्मीच्या पुण्याचे फलस्वरूप म्हणजे मनुष्य जन्म. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारे सुयोग्य पद्धतीने जीवन व्यतीत केल्यानंतरच मुक्ती मिळते. मनुष्य जन्म सत्कारणी लावला असता अनंत यमयातनांतून मुक्ती मिळते. मनुष्य स्वभाव विविधरंगी, आणि बहुढंगी असतो.
 प्रत्येकाची आवड, निवड, आचार, विचार, स्वभाव, बुद्धी आणि शारीरिक क्षमता वेगळी असते आणि त्यानुसारच जो तो आपले जीवन व्यतीत करतो. पण जेव्हा मनुष्य आपल्या कुवतीनुसार योग्य त्या पद्धतीने आयुष्य जगतो तेव्हा त्यांस सदगती प्राप्तं होते.  प्रत्येक मुलाने आई-वडिलांचे कृतज्ञ असले पाहिजे. आपण कोणत्याही सामान्य व्यक्तीपुढे विनम्र झाले पाहिजे. आपण इतरांशी मानसन्मानानेच वागले पाहिजे. प्रत्येक आई-वडिलांनी अनेक कष्ट सोसलेले असतात व त्याग केलेला असतो. जरी शिक्षकांनी अथवा आई-वडिलांनी मुलाला शिक्षा केली तरीही मुलांनी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ते आपल्यावर का रागावले, याचे मुलांनी चिंतन केले पाहिजे. ‘निश्चितच आपली काही चूक असली पाहिजे’, असा सूज्ञ विचार त्याने केला पाहिजे. कारण रागावण्यामुळे आई-वडील किंवा शिक्षक यांचा वैयक्तीक काहीच फायदा होत नाही. 
आपल्या मुलाने सुधारावे, त्याची वागणूक आदर्श व्हावी व लोकांनी त्याला चांगले म्हणावे या गोष्टींच्या ध्यासापोटी हा राग व रागवणे असते. तिºहाईताच्या मुलांना आई-वडील रागावत नाहीत. आपल्या मुलाच्या प्रेमापोटी हा राग असतो व यामुळे मुलांनी याबद्दल मनात राग न धरता आई-वडील व शिक्षक यांचे आभारच मानले पाहिजेत. या जगात फुकट अशी कोणतीच गोष्ट मिळत नाही. आपले आई-वडील आपल्याला खाऊ, खेळणी अन्न, वस्त्र इत्यादी सर्व गोष्टी मायेने पुरवतात. त्याच्या बदल्यात मुले त्यांना काय देतात ? ते पैसे तर देऊ शकत नाहीत. निदान मुलांनी आई-वडिलांना आदर तरी द्यावा. घरातील वडील मंडळींच्या दररोज पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. एखाद्याने आपल्याला काही दिले, तर आपण त्यांचे आभार मानतो. आदरपूर्वक आभार मानण्याची अथवा कृतज्ञता व्यक्त करण्याची पारंपरिक भारतीय पद्धती म्हणजे वाकून नमस्कार करणे होय. 
काही मुलांना आपल्या आई-वडिलांच्या पाया पडायची लाज वाटते. आपली आई आपले मल-मूत्र साफ करणे, कपडे धुणे, आपल्याला आवडणारे जेवण करणे, जेवू घालणे यासाठी दिवसातून कितीतरी वेळा आपल्यासाठी खाली वाकते. मुलाच्या चुकीमुळे काही वेळा आई-वडिलांना शरमेने मान खाली घालावी लागते. या सर्व गोष्टींची परतफेड करता येणे शक्यच नाही. मग निदान आई-वडिलांना खाली वाकून नमस्कार करण्यात मुलांना मुळीच लाज वाटू नये.

- मीना चंदन
दहीगाव, ता. तेल्हारा.

Web Title: Parents are the first gurus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.