माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी॥
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:43 IST2019-06-27T14:43:33+5:302019-06-27T14:43:38+5:30
वारी परंपरेची...

माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी॥
माझे जीवीची आवडी।
पंढरपुरा नेईन गुढी॥
या संत उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी आषाढी वारीचा संकल्प केला आणि तो आजही भव्य-दिव्य स्वरूपात चालू आहे. आळंदी येथे माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते आणि ती पालखी माऊलींच्या आजोळ घरी मुक्कामी थांबते. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या गजरामध्ये मोठ्या उत्साहात पुढे मार्गस्थ होते. आळंदीवरून निघाल्यानंतर पुणे शहरामध्ये मुक्कामी थांबते. दोन दिवस मुक्कामी राहून परिसरातील वातावरण माऊलीमय बनलेले असते. वारीच्या मार्गावर प्रत्येक गावात दररोज सात्विक आणि माऊलीस्वरूप बनलेले असते. पहावं तिथे हाच गजर सुरू असतो. त्यामुळे माळकरी व वारकरी नसलेले सुद्धा लोक सेवाभावी बनतात. पालखी आलेल्या दिवशी गावात प्रत्येक जण उपस्थित सर्व वारकरी भाविकांची सोय करण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी जात, पात, धर्म, पंथ, पक्षभेद विसरून संपूर्ण गाव स्त्री-पुरुषांसहित वारकरी सेवेबद्दल प्रयत्न करताना पाहायला मिळतात. पालखी मार्गावर गावागावात सलोखा, ऐक्य, सेवाभावाचे संस्कार या माध्यमातून होत असल्याने पालखी सोहळ्याची आतुरतेने सर्व जण वाट पाहत स्वागताचीही तयारी करतात.
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते त्यावेळी आपण हजर राहून सोहळ्याचा आनंद घ्यावा, ही धारणा वारकरी भाविकांची असते. प्रस्थानाला उपस्थित राहिल्याने वारी केल्याचे पुण्य मिळते म्हणून ज्यांना वारीसाठी प्रारब्धामुळे जाता येत नसेल तर त्यांनी प्रस्थानाला उपस्थित रहावे, ही धारणा वारकरी भाविकांची असते. काही वारकरी पालखीसोबत चार पाऊल चालावं लागतं म्हणून पुण्यापर्यंत चालत येतात. आळंदी ते पुणे भाविकांची गर्दी वाढतच असते. उत्साहपूर्ण वातावरणात नामाचा गजर करत तरुणही पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.
‘चला पंढरीसी जाऊ।
रखुमादेवीवरा पाहू॥’
या संत उक्तीप्रमाणे वारकरी पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. कोणत्याही सोयीसुविधांचा विचार न करता भजनामध्ये तल्लीन होऊन अठरा दिवस पायी चालत येतात. वारकरी परंपरेतील सर्वात मोठी परंपरा म्हणून या वारीकडे पाहिलं जातं. वारी सर्व वारकरी भाविकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
- सुधाकर इंगळे महाराज