निसंशयी मनाची अवस्था परिपक्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 08:52 IST2019-02-18T08:48:20+5:302019-02-18T08:52:02+5:30
श्रद्धेने व विश्वासाने केलेल्या कर्माला चांगली गती मिळते. त्याला त्याचे फळ लागते. संशयी मनात विकृती निर्माण होते. संशयी मन कोणताही हेतू साध्य करू शकत नाही.

निसंशयी मनाची अवस्था परिपक्व
एक व्यक्ती तीर्थाला जायला निघाला जाता-जाता त्याच्या मनात विचार आला. आपल्या घरचे गायी-म्हशी-घोडे, याची जबाबदारी कुणावर तरी सोपवून जावु... पण जाण्यापूर्वीच त्याच्या मनात अनेक शंका उत्पन्न होवू लागल्या. माझ्या माघारी गायी-म्हशी कुणी चोरलं तर काय होईल. मी तीर्थाला गेल्यास माझ्या कुटुंबाचे काय? कुणाचे मरण-धरण झाले तर तर काय? अशा एक-ना-अनेक प्रश्नांचे काहूर त्याच्या मनात आले. शेवटी त्याच्या मनानेच तीर्थाला जाण्याचा मानस रद्द केला. जाणारा माणुस मनात शंका आल्यामुळे गेला नाही याचे कारण मनातला संशय विषयात गुंतलेल्या मनात संशय निर्माण होतो. जपी-तपी-संन्यासी कोणीही असो ज्यांचे मन संशयी आहे. त्या माणसांचे कल्याण होत नाही. निसंशयी मन कणखर असते कोणतेही हेतू साध्य करण्यासाठी संशयी मनाची गरज असते. मनुष्याच्या शुद्धीकरणासाठी निसंशय मन असावे लागते. साधु-संत-कुटुंब, देश-देव या सर्वांवर विश्वास ठेवून कार्य केले जाते. त्यानुसार त्याला त्याचे फळ मिळते. श्रद्धेने व विश्वासाने केलेल्या कर्माला चांगली गती मिळते. त्याला त्याचे फळ लागते. संशयी मनात विकृती निर्माण होते. संशयी मन कोणताही हेतू साध्य करू शकत नाही. वसिष्ठ, व्यास, वाल्मिकी, शुक्र, नारद, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी पूर्वसंतानी जे कार्य केले ते निसंशयीवृत्तीने श्रद्धापूर्वक व शुद्धस्वरूपात ईशतत्वावर विश्वास ठेवून कर्म करून दाखवले. ज्ञानाचा प्रचार केला. वेद-शास्त्र-पुराण इत्यादीवर विश्वास ठेवून परमार्थाची खरी तत्वे जगासमोर मांडली. याचे कारण निसंशयी भक्ती केली. आपल्या कार्यास संशय नसावा. आत्मविश्वासाने केले कार्य सिद्धीला जाते. निसंशयी मन उत्कृष्ट असते त्याच्याकडून चांगले कृत्य घडतात. भुतमात्रात उच्च-नीच असा भेद करीत बसत नाही. निसंशयी मनाची अवस्था परिपक्व असते. कोणतेही कार्य करीत असता विश्वासपूर्वक करतो. त्यामुळे त्याला अडचणी आल्या तरी ते कार्य सोडुन जात नाही. त्याला त्याच्या कर्मावर संशय नसतो. त्यामुळे तो यशस्वी होतो. कुणाचा विश्वास कोणावर असो अथवा नसो. मात्र आपल्या कर्मावर निसंशय आपला विश्वास असावा. स्वत:चा विश्वास स्वत:वर असणे हीच मोठी यशस्वी मनाची गुरूकिल्ली आहे.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)