श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:15 IST2019-05-08T06:14:44+5:302019-05-08T06:15:31+5:30
श्रीमंतीचं शास्त्र आहे अन् गरिबीची कारणं आहेत. श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत असतो. श्रीमंतीचं शास्त्र फारच सोपं आहे. या शास्त्रात फक्त चांगलाच विचार करायचा आहे.

श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत
- विजयराज बोधनकर
श्रीमंतीचं शास्त्र आहे अन् गरिबीची कारणं आहेत. श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत असतो. श्रीमंतीचं शास्त्र फारच सोपं आहे. या शास्त्रात फक्त चांगलाच विचार करायचा आहे. श्रीमंत माणसं सकारात्मक म्हणजे यशाचाच विचार करतात. म्हणून त्यांच्या पदरात यशच पडतं आणि गरिबी टिकवणारी माणसं नकारात्मक म्हणजे अपयशाचा विचार करतात. त्यांच्या पदरात अपयशच पडतं. देव हा सकारात्मक विचार करायला लावणारा मार्ग आहे. पण गरीब माणसं देवाजवळ फक्त आपली गाºहाणी घालतात. अडचणी आपण निर्माण करतो. त्या सोडवायच्यासुद्धा आपणच. त्यात देव काहीही सहकार्य करू शकत नाही.
देव हा नेमकं काय देतो तर नवा विचार आणि प्रेरणा देतो. बुद्धी हे असं एक कपाट आहे ज्यात माणूस आपले अनंत विचार, बालपणापासूनच्या आठवणी, घडून गेलेल्या घटनांचे तपशील, पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी, कथा, व्यथा, भेटलेल्या चित्रविचित्र माणसांचे अनुभव, अचानक सुचलेल्या नवकल्पना, मित्रांनी, गुरूजनांनी, मातापित्यांनी दिलेले मौलिक सल्ले अशा अनेक गोष्टी मेंदू आपल्या कप्प्याकप्प्यात साठवून ठेवतो आणि योग्य वेळी योग्य गोष्टीचा वापर करतो. ज्याची बुद्धी सतत निसर्गाकडून, समाजाकडून प्रेरणा घेत कृती करीत असतो आणि तोच कृतिशील मानव मनाने, धनाने, तनाने श्रीमंत होऊ शकतो. यात देव फक्त एक दुवा असतो.
जो मानव बुद्धीचा काहीच वापर करीत नसेल तर त्याला गरिबी अधिक गिळत जाते. अशा गरिबांनी कितीही तीर्थयात्रा केल्या, पूजापाठ केले, व्रतवैकल्ये केली तरी देव त्याच्या पदरात गरिबीच टाकत राहतो. कारण देव झोपणाऱ्याला झोप देतो आणि बुद्धीने चालणाºयाला बुद्धी देतो. हेच श्रीमंतीचं शास्त्र आहे.