सगुणाची ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:43 IST2019-02-11T00:43:20+5:302019-02-11T00:43:35+5:30
- प्रा. शिवाजीराव भुकेले संत चळवळीला हे पूर्णपणे ठाऊक आहे की, निर्गुणाला धक्का न लावता सगुणाची यथार्थ ओळख करून घेता ...

सगुणाची ओळख
- प्रा. शिवाजीराव भुकेले
संत चळवळीला हे पूर्णपणे ठाऊक आहे की, निर्गुणाला धक्का न लावता सगुणाची यथार्थ ओळख करून घेता येते. अर्थात सगुणा-निर्गुणातील भावनेचे प्रामाणिक प्रकटीकरणही महाराष्ट्रातील संत चळवळीची संपूर्ण देशाला मिळालेली खरी आध्यात्मिक देणगी आहे, असे आज आधुनिक बुद्धिवंतही मानू लागले आहेत. समाजाची जडत्वाची अवस्था नष्ट होऊन त्यात एक चैतन्य संचारले पाहिजे. त्यासाठी संतांनी त्याला नावारूपाला आणले. एवढेच नव्हेतर त्याच्या सगुण रूपाच्या भोवती आपल्या प्रतिभेचे असे आंगडे-टोपरे शिवले आहे की, कधी तो माझे आघडे-बघडे-छकुडे वाटू लागतो, तर कधी पंढरीनिवासा सखा वाटू लागतो. कधी-कधी संत विठाई-किताई कृष्णाई, कान्हाई या अर्थभावनेने त्याला साद घालू लागतात. जनाबाईला तर तो आपले आईवडील, बंधू आणि सर्वांत जवळचा मित्र वाटतो. संतांच्या या प्रयत्नांमुळे भक्तीच्या मर्यादित क्षेत्रात का असेना, एक आत्मजाणीवेची पहाट निर्माण झाली. परमेश्वराच्या सगुण-निर्गुणातीत भक्तिभावनेला महत्त्व देणारे भक्तांचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात,
।। मलया निळ शीत निळू, पालवी नये गाळू
सुमनाचा परिमळू गुंफिता नये
पैसा झाला सर्वेश्वरू, म्हणू नये साना थोरू
त्याच्या स्वरूपाचा निर्धारू कवन जाणे।।
मलयेगिरीवरून वाहणाऱ्या सुगंधी वाºयाला कधी गाळून घेता येत नाही. फुले गुंफून त्याची सुंदर माळ तयार करता येईल; पण फुलांचा सुगंध गुंफता येत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही आणि गगनाला गवसणी घालता येत नाही, तशीच आहे परमेश्वरी शक्ती.