The highest of life | जीव सर्वाधिकारी
जीव सर्वाधिकारी

आत्यंतिक दु:खातून निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हेच समग्र जीवजातीचं ध्येय आहे. मोक्ष हाच त्याचा ध्यास आहे. त्या शाश्वत सुखाचा अधिकारी फक्त जीव आहे, असं परमेश्वराला अपेक्षित आहे. परिसस्पर्शानं सोनं होण्याचा अधिकार लोखंडाला आहे. खापराला किंवा दगडाला नाही. तसाच मोक्षाधिकार फक्त जीवालाच आहे. तूप होण्याचा अधिकार दुधालाच असतो. पण त्याला आधी दही, नंतर लोणी, त्यानंतर रवीच्या मंथनातून बाहेर पडावं लागतं. अंतिमत: कढईत तापून सुलाखून शुद्ध व सिद्ध व्हावं लागतं. मगच तुपाचं मूल्य वाढतं. पशू, पक्षी, वनस्पती, दगड, माती, प्रत्येकात गुणधर्माचे काही अंशी अधिकार असतात. कोकिळेचा आवाज, सुगरणीचं घर, वनौषधी, मृगगंध इत्यादी. पण हे अपूर्ण आहे. मानवी जीवाला सर्वाधिकार आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती
म्हणूनी नरदेहीच प्राप्ती परलोकाची
जीवाचं श्रेष्ठत्व त्यांनी सांगितलं आहे. गती व विकास केवळ मानवी देहातच आहे. कुठल्याही क्षेत्रात जीव हा अग्र्रेसर असल्याचा अनुभव आपण घेत आहोत. म्हणून ज्याला काहीही जमतं तो सर्वत्र गाजतो. त्याला चोर, पोलीस, शिक्षक, डाकू, सज्जन, पशू व नारायणही होता येतं. माणसाचा कचरा होतो. त्याचा देवही होतो. तो नरकात जातो, मोक्षही गाठतो. हा सागराचा तळ गाठतो व चंद्रावर पायही ठेवतो. माणसांना मारता मारता तो क्षणात बदलतो. त्याची अशी एकाहून एक अनेक रूपं पाहून राष्ट्रसंत म्हणतात -
जंबूक मेंढ्या कुत्रे डुकरे, मिळे बहुत पण काय करू
त्यांना शहाणे करण्यासाठी, मला हवा माणूस भला
त्यात स्वार्थी माणसाने जाती निर्माण केल्या.
व काहींचे अधिकार हिरावून घेतले व स्वनिर्मित कल्पना धर्मग्रंथात पेरल्या. धर्मनियम तयार करून माणसाचे तुकडे केले.

- बा. भो. शास्त्री

Web Title: The highest of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.