आनंदाचे उद्गार चिन्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 10:08 PM2018-12-17T22:08:40+5:302018-12-17T22:09:34+5:30

काही वर्षांपूर्वी एक अप्रतिम हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्याची मध्यवर्ती कल्पनाच होती ‘आनंद’.

An exclamation mark of joy! | आनंदाचे उद्गार चिन्ह!

आनंदाचे उद्गार चिन्ह!

Next

- रमेश सप्रे


काही वर्षांपूर्वी एक अप्रतिम हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्याची मध्यवर्ती कल्पनाच होती ‘आनंद’. तेच त्या चित्रपटाचं नावही होतं. जीवनातील कोणत्याही गोष्टीचा आनंदानं स्वीकार हा संदेश तर त्यात होताच; पण जीवन जसं आपल्याला शोधत येईल, आपल्या भेटीला येईल तसा त्याचा स्वीकार हाही महत्त्वाचा. इंग्रजीत म्हटलंय ना ‘मीट लाईफ अ‍ॅज इट सिक्स यू’ कशाबद्दल म्हणजे अगदी कशबद्दल तक्रार न करणारी व्यक्ती आनंदी असते. ‘आनंद’ चित्रपटातील एक मार्मिक प्रसंग पाहू या.

आनंदचा डॉक्टर मित्र त्याच्या रक्त वगैरेच्या तपासण्यांचे रिपोर्टस पाहून गंभीर होतो. ते पाहून आनंद विचारतो, ‘मला काय झालंय?’ डॉक्टर सांगतो. ‘कॅन्सर!’


आनंद यावर हसत म्हणतो, ‘शक्यच नाही. एवढा छोटा रोग मला होणं शक्यच नाही. याच्यापेक्षा इन्फ्लूएंझा-टायफाईड हे रोग मोठे वाटतात. डॉक्टर, तुझ्या भाषेत सांग माझ्या रोगाचं नाव.’ यावर डॉक्टरचं उत्तर ‘लिंफोसर्कोमा आॅफ् द इंटेस्टाईन (आतड्याचा कर्करोग)’ हे ऐकून टाळी वाजवत आनंद म्हणतो ‘ये हुई ना बात! कैसा किंगसाईज रोग है!’


काय वृत्ती आहे ही! मूर्तीमंत आनंद! ही सारी उद्गारचिन्हं पाहून एक विचार मनात आला की आनंदाचं विरामचिन्ह कोणतं? पूर्णविराम नाहीच. कारण आनंद सततच उसळत असतो. स्वल्पविरामही नाही. कारण आनंदाचे तुकडे पाडता येत नाहीत. प्रश्चचिन्हही नाही. आनंदाचं विरामचिन्ह उद्गारवाचकच असतं. निसर्गातल्या सूक्ष्म जीवांपासून महाकाय प्राण्यापर्यंत, जीवनातल्या लहान घटनेपासून महान घटनेपर्यंत, बदलणाऱ्या ऋतूतील प्रत्येक दृश्यात मग तो कोसळून चिंब भिजणारा पाऊस असो किंवा नयनमनोहर इंद्रधनुष्य असो, अंधाºया रात्री आकाशात चमचमणारे असंख्य तारे असोत की सर्द थंडीतलं आंधळं बनवणारं धुकं असो साºया अनुभवात दडलेला असतो एक उद्गार... तो आनंदाचाच असतो; पण त्यासाठी आपण संवेदनाक्षम असायला हवं.


लहान मुलं आनंदाच्या मूर्ती असतात. असं म्हणतात की लहान मुलं स्वर्गीय आनंदाचा उपभोग घेत असतात कारण त्यांच्या अवतीभवतीच स्वर्ग पसरलेला असतो. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची जिवंत जिज्ञासा आणि कधीही न कोमेजणारं कुतूहल. लहान मुलं विचारत असलेल्या असंख्य प्रश्नात त्यांची केवळ ज्ञान मिळवण्याची इच्छा नसते तर आजूबाजूच्या अनेक गोष्टीत दडलेल्या रहस्याचं अनावरण झालेलं त्यांना हवं असतं. यात वैचारिक, वैज्ञानिक संशोधनापेक्षा गुपितांच्या शोधातून मिळणारा आनंद असतो.


असं बालमन आपल्याला मिळालं तर आनंद सागरावर अखंड पोहत राहणं अवघड नाही. यालाच म्हणतात ‘प्रौढत्वी निजशैशवास जपणं’ म्हणजेच वय वाढलं तरी आपल्या आतलं लहान मूल जिवंत ठेवायचं. गंमत म्हणजे बालपणी जी कल्पनाशक्ती मनाच्या मोकळ्या आकाशात आनंदाचा प्रकाश भरून टाकते तीच कल्पनाशक्ती मोठेपणी चिंता-काळजीचं ग्रहण आनंदाला लावते. याला जबाबदार आपणच या कल्पनाशक्तीला विचारशक्तीची त्याहूनही विवेकाची जोड दिली तर संसारसागर तरुण जाणं अगदी सुलभ होतं. ज्ञानोबा माउलीची एक प्रसिद्ध ओवी आहे.


मज हृदयी सद्गुरु। जेणे तारिलो हा संसारपूरु।
म्हणोनि विशेषे अत्यादरु। विवेकावरी।।

संसारात घडणाºया घटना या भवसागरावरच्या लाटा समजल्या तर त्या तरुन जाण्यासाठी तारून नेणारा (भवतारक) सद्गुरु आपल्याला विवेकशक्ती देतो. त्यामुळे प्रत्येक घटनाप्रसंगाचा सकारात्मक अर्थ लावता येतो आणि आनंदाचा अक्षय अनुभव घेता येतो.
कवयित्री बहिणाबाई चौधरींचे सुपुत्र सोपानदेव चौधरी. यांच्या जीवनातला एक हृद्य प्रसंग आपल्याला आनंदाचं सूत्र सांगून अंतर्मुख करतो. त्यांना जेव्हा कॅन्सर झाल्याचं डॉक्टर सांगतात तेव्हा ते आनंदानं उद्गारतात कॅन्सर! म्हणजे नो आन्सर! (कॅन्सरला उत्तर नाही. उपाय नाही) ज्यावेळी डॉक्टर रक्ताचा कॅन्सर (ल्युकेमिया) झालाय म्हणून सांगतात तेव्हा सोपानदेवांचे हजरजबाबी उद्गार असतात. ‘रक्ताचा कॅन्सर! व्वा! जीवन म्हणतंय आता तरी विरक्त व्हा!’ कमालीची आनंदी वृत्ती आहे ना ही!


एकूण काय आनंद मिळवणं, आनंदी राहणं बिल्कुल अवघड नाही. अवघड आहे ती आनंद मिळवण्यासाठी आवश्यक ती दृष्टी नि वृत्ती. एकदा हे जमलं की आपली नि इतरांची प्रत्येक कृती आनंदाची खाण बनून जाईल. यासाठी हवं सद्ग्रंथांचे वाचन-मनन नि चिंतन. तसंच सदाचरण नि त्याला पूरक पोषक सत्संगती. म्हटलं तर हे आपल्याला सहज शक्य आहे नाही?

Web Title: An exclamation mark of joy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.