भक्तीतला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:29 AM2018-11-27T06:29:56+5:302018-11-27T06:30:04+5:30

कस्तुरीच्या सुगंधाला मातीत मिसळले, चिखलात घोळले तरी तो सुगंध येत राहणारच.

Devotion to HAPPINESS | भक्तीतला आनंद

भक्तीतला आनंद

Next

- प्रा. शिवाजीराव भुकेले


कस्तुरीच्या सुगंधाला मातीत मिसळले, चिखलात घोळले तरी तो सुगंध येत राहणारच. कारण रूपापेक्षा गुणात्मक सुगंध देणे, हेच कस्तुरीचे सामर्थ्य आहे. चंदनाच्या सुगंधावर कधी भाष्य करता येत नाही. वाऱ्याची एक झुळूक आली की, नाकाला आपोआपच संवेदना होते. मोत्याचे पाणी रांजणात भरता येणे शक्य नाही आणि गगनाला कधी गवसणी घालता येत नाही. तद्वतच भक्ती भावनेवर कुठल्याही शास्त्री पंडिताने औपचारिक भाष्य करण्याची गरज नसते. कारण भक्ती हाच भक्ताच्या जीवनाचा सर्वोच्च बिंदू असतो, नव्हे त्याच्या दृष्टीने तोच खरा साक्षात्कार असतो. जो परमात्मा सागरापेक्षा अथांग, आकाशाएवढा व्यापक व जेथे खुज्यांची उंची पोहोचत नाही एवढा उत्तुंग आहे, त्या परमात्म्याला मात्र आपल्या भावभोळ्या भक्तीच्या चिमटीत पकडताना उपेक्षेचे वाळवंट तुडविणारी जनाई म्हणते -


धरिला पंढरीचा चोर। गळा बांधोनिया दोर ।
हृदय बंदीखाना केला । आत विठ्ठल कोंडिला ।
शब्दे केली जडाजुडी । विठ्ठलपायी घातली बेडी ।
सोंहम शब्दांचा मारा केला ।
विठ्ठल काकुळतीला आला ।
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुला ।


जेव्हा पोटातील वेदना शब्दरूप होऊन ओठावर येतात तेव्हा आपल्या आराध्याविषयी अपार श्रद्धाभाव भक्तांच्या वाणीतून प्रकट होऊ लागतात. म्हणून भक्ती ही भक्ताची मिरासी आहे. ती एक जीवननिष्ठा आहे. मनाचे सामर्थ्य वाढविणारी ती एक अद्भुत शक्ती आहे. तो एक पलायनवाद नव्हे. सर्वसामान्यपणे भक्तीकडे आजही अनेक प्रतिभावंतांकडून पलायनवाद म्हणून पाहिले जाते, तर ईश्वर प्रसन्नतेकडे संकट काळातून बाहेर काढणारी खिडकी म्हणून पाहिले जाते. जगाच्या त्रासाने क्लान्त व भ्रांत झालेल्या बालकाने आपली वेदना मातेसमोर मांडणे हा काही पलायनवाद नव्हे.


सद्भक्तांच्या दृष्टीने जर भगवंत माता-पिता, कर्ताधर्ता आहे अशी भक्तांची जर भावना आहे तर ‘झालो वियोगे हिंपुटी’ हा सद्भाव भगवंतासमोर भक्त जर प्रकट करीत असेल तर तो पलायनवाद नव्हे. जर आपल्या साºया तनामनात ईश्वरभक्ती मुरली की, जीवनाची वेल ईश्वरी साक्षात्काराच्या शक्तीने बहरून जाते. भक्तिभावनेमध्ये जेव्हा देहाची बंधने गळून पडतात तेव्हा अष्टसात्त्विक भावनेच्या साम्राज्यात भक्ताचे अवघे लौकिक भानच फुलपाखरासारखे हलके-हलके होऊ लागते.

Web Title: Devotion to HAPPINESS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.