पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 07:30 PM2019-07-08T19:30:51+5:302019-07-08T19:30:54+5:30

वारी.. एक तप !

Chandrabhaga baths and Vishnu Vitoba | पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे

googlenewsNext

पंढरीची वारी हे एक तप असून, आनंद प्राप्तीसाठी पत निर्माण करणारे माध्यम आहे. वारीत चालत असताना भाविकांकडून कायिक, वाचिक, मानसिक तीन प्रकारचे तप घडते. पायी चालत राहिल्याने कायिक तप घडते. शिवाय शरीराकडून वेगवेगळी सेवा घडत राहिल्याने ते एक प्रकारचे कायिक तप घडते. हाताने टाळी, मुखाने भजन हे तप घडण्यासाठी सांगितलेला मार्ग म्हणजे वारी आहे.

लागोनिया पाया विनवीतो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम’ या संतवचनाप्रमाणे आपण साधना केली तर आपल्याकडून तप घडेल म्हणून वारीची परंपरा सुरु केली. प्रत्येक व्यक्तीकडून दररोज दहा प्रकारचे पाप घडत असते. कायिक तीन, वाचिक चार, मानसिक तीन असे एकूण दहा प्रकारचे पाप घडत असते . पापाचे फळ दु:ख असून, पुण्याचे फळ सुख आहे. सुखाची प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते, परंतु पुण्य करावे वाटत नाही. मला दु:ख व्हावे असे म्हणणारा जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती भेटत नाही. तरी कोणाचेही दु:ख गेलेले पाहावयास मिळत नाही. कारण दु:खाचे मूळ पाप असून, ते कोणालाही चुकविता येत नाही.

पापाचे डोंगरच्या डोंगर प्रत्येकाच्या कर्मातून पाहावयास मिळतात. पाप दाखविण्यासारखी वस्तू नसून, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या वेदना होतात त्या पापामुळेच होतात. निषिद्ध कर्म म्हणजे चुकीचे कर्म, कर्तव्य विन्मुख कर्म याला पाप म्हणतात. या सर्व पापातून मुक्त होण्यासाठी तप खूपच गरजेचे आहे. हे तप घडण्यासाठी वारी करावी लागते. ब्रह्मदेवालाही सृष्टी निर्माण करण्याअगोदर तप करावे लागले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहण्यासाठी लागणाºया पुण्याचा विचार मांडत असताना मला तप करावे लागले होते, असे नमूद केले आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये तपाची खूपच आवश्यकता असते. वारीमध्ये भाविकांकडून सहज तप घडते. तपासाठी वेगळा अट्टाहास करावा लागत नाही. वारी म्हणजेच एक तप आहे. यामध्ये कायिक तपाबरोबर वाचिक तप घडते. मुखाने नामस्मरण करणे हे वाचिक तप ठरते. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ ग्रंथातून संदेश दिला, ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा’ वारीमध्ये नामस्मरण, भजनासाठी वेगळा अट्टाहास करावा लागत नाही.मनही या सर्व सेवेत रममाण झालेले असते. मनाचा स्पर्श साधनेला असल्यामुळे ते एक प्रकारचे मानसिक तप घडते. मुखाने भजन, कीर्तन सतत घडत राहिल्याने मनाचा स्पर्श साधनेला होतो व त्याचे रूपांतर तपात होते.

तपश्चर्येचे निर्माण झालेले बळ जीवन जगत असताना खूपच उपयोगाचे ठरते. कोणतेही कार्य करत असताना त्याला लागणारी ऊर्जा सात्विक असेल तर कार्य निर्विघ्नपणे पार पडते़ या सात्विक ऊर्जेला वारकरी संप्रदायामध्ये तप असे संबोधले गेले आहे़ असे तप आपल्याकडून घडावे या भावनेतून वारकरी कधीच वारी करत नाहीत. परंतु त्यांच्याकडून वारी केल्यानंतर तशा प्रकारचे तप घडते. आणि त्या तपाचा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये व सेवेमध्ये साधनेलाही उपयोगी ठरतो म्हणून निष्ठेने वारकरी पंढरपूरची आषाढी वारी करतात.
- सुधाकर इंगळे महाराज

Web Title: Chandrabhaga baths and Vishnu Vitoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.