आनंद तरंग - शास्त्रग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 01:50 AM2020-08-03T01:50:10+5:302020-08-03T01:51:04+5:30

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे

Ananda Tarang - Shastragranth | आनंद तरंग - शास्त्रग्रंथ

आनंद तरंग - शास्त्रग्रंथ

googlenewsNext

सौरभ कुलकर्णी

श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला वेदांचे सार असे म्हटले जाते. संपूर्ण वेद हे आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवितात. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान त्यात असते. जीवनशैलीवर त्याचा प्रभाव असतो. म्हणूनच त्यांना शास्त्र असेही म्हटले जाते. त्याप्रमाणे श्रीमद्भगवदग्ीतेलाही ते एक शास्त्र आहे, असे म्हटले जाते. कारण यात भगवान वेदव्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाद्वारा, तसेच अर्जुनाला उदाहरण म्हणून घेऊन जीवनाची सोपी पद्धती अठरा अध्यायांच्या द्वारा समजावून सांगितली आहे. जीवनात अनेकदा कठीण वाटणारे प्रश्न पडतात. भगवद्गीतेत त्याची उत्तरे सापडतात अन् आपला मार्ग मोकळा होतो. म्हणून श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला शास्त्र असे म्हटले जाऊ शकते. या ग्रंथाची निर्मिती कर्ममार्ग, उपासनामार्ग, तसेच ज्ञानमार्ग असे जीवनातील प्रश्नांवर तोडगा देणारे तीन मार्ग सांगण्यासाठी केली आहे.

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे ते करण्यासाठी प्रवृत्त झालेला असला तरीही समोर आप्तस्वकीय, अगदी जवळचे लोक आहेत हे त्याने पाहिले तेव्हा त्याचा निश्चय ढळायला सुरुवात झाली. स्वकीयांसोबतच युद्ध कसे करायचे, त्यांचा पराभव करण्यासाठी कसे लढायचे, असे प्रश्न त्याला पडले, असे पहिल्या अध्यायात सांगितलेय. रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असे वाटू शकते की, मी जे करीत आहे ते अगदी योग्य करतो आहे का अयोग्य? तेव्हा आपला उद्देश योग्य असेल व तो पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या मार्गात कोणाबद्दलही शारीरिक, मानसिक, वाचिक हिंसा घडू नये. मात्र, तसे करणे काही अपरिहार्य कारणांमुळे होत असेल तर तेवढ्या गोष्टींसाठी त्याची व ईश्वराची माफी मागून योग्य म्हणजेच सर्वांसाठी हितकारक अशा गोष्टी आपण आयुष्यभर करीत राहणे, हे अर्जुनाच्या दृष्टांताने आपल्याला या ग्रंथातून शिकायचे आहे. म्हणून हा एक उत्तम शास्त्रग्रंथ आहे.

Web Title: Ananda Tarang - Shastragranth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.