आनंद तरंग: एकमेकां सहाय्य करू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 00:10 IST2020-05-06T00:10:00+5:302020-05-06T00:10:14+5:30
आर्थिक महासत्तेसाठी युद्धजन्य स्पर्धा चालू होती. त्यासाठी आर्थिक समृद्धी व तुलना हेच निकष वापरले जात होते

आनंद तरंग: एकमेकां सहाय्य करू...
फा. फ्रान्सिस दिब्रिटो
काही वर्षांपूर्वी एक बंगाली चित्रपट पाहिला होता. ‘एक्सेस टू सक्सेस’ म्हणजे ‘यशाकडे वाटचाल’ असं त्याचं नाव होतं. काय असते हे यश! आध्यात्मिक जीवनात सर्व सिद्धी प्राप्त होणे, जीवन निरिच्छ व निरामय होणे यालाच यश म्हटले जाते. भौतिक जीवनात मात्र कमविण्यात, जमविण्यात व इतरांपेक्षा अधिक मिळविण्यात यश समजले जाते. उंच टॉवरच्या चोविसाव्या मजल्यावरील सदनिका मिळविणे हे ‘त्या’तील नायकाचे स्वप्न होते. कष्ट, जिवाचा आटापिटा करून घेतलेल्या सदनिकेचा ताबा घेण्यासाठी तो टॉवरमध्ये जातो; पण काही मजले गेल्यावर लिफ्ट बंद पडते. उरलेले जिने चढत तो सदनिकेच्या दाराशी पोहोचतो. दरवाजाला चावी लावताच दुर्दैवाने तो खाली कोसळतो व क्षणार्धात गतप्राण होतो. बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे सारं जग जिंकलं; पण आत्मा गमावला तर काय अर्थ? जगाने दोन संहारक महायुद्धे अनुभवली आहेत. तिसरे शीतयुद्ध चालू होते व आजही आहे.
आर्थिक महासत्तेसाठी युद्धजन्य स्पर्धा चालू होती. त्यासाठी आर्थिक समृद्धी व तुलना हेच निकष वापरले जात होते. नीती, माणुसकी यांना थारा नव्हता. काही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या अतिसंपन्न झाली; तर काही गरीब राहिली. त्यांच्या गरिबीची कारणे म्हणजे बड्या राष्ट्रांनी त्यांचे केलेले शोषण, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या केलेली लूटमार. आपली पोळी भाजण्यासाठी राष्ट्रा-राष्ट्रांत लावून दिलेली भांडणे, शस्त्रनिर्मिती व विक्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांचा लेखाजोखा करायचा तर मानवाच्या हाती काय गवसेल? आर्थिक सामर्थ्य हा प्रश्न सोडवू शकतो का? तसे असते तर आज अमेरिकेत मृतदेहांचा सडा पडला नसता. या महासंकटाशी मुकाबला करताना आपण काही शिकणार आहोत का? आपल्याला अध्यात्माकडे वळावे लागेल. ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हा याचा सुवर्णमार्ग आहे. विकसनशील देशांना जगवायचे कसे? त्यांना आपल्या पातळीवर आणायचे कसे याचा विचार होऊन तशी कृती झाली तरच ‘करोना’पासून खूप काही शिकलो असे म्हणता येईल.