आनंद तरंग - जेथे कामु उपजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 06:59 IST2019-01-07T06:58:36+5:302019-01-07T06:59:02+5:30
साधकाच्या साधन मार्गावरील वाटचालीत आडवा येणारा सर्वांत मोठा भुजंग म्हणजे ‘काम’ नावाचा विकार होय.

आनंद तरंग - जेथे कामु उपजला
प्रा. शिवाजीराव भुकेले
साधकाच्या साधन मार्गावरील वाटचालीत आडवा येणारा सर्वांत मोठा भुजंग म्हणजे ‘काम’ नावाचा विकार होय. ‘कामा’च्या प्रभावामुळे ‘इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, तर नारद चुकला चाळा भजनाचा’ असा सर्वव्यापी शत्रू म्हणजे काम विकार होय. जोपर्यंत पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये यांना साधकास जिंकता येत नाही, तोपर्यंत तो अकरावे अतिंद्रिय इंद्रिय मनास जिंकूच शकत नाही. त्यातल्या त्यात ‘काम’ हा विकार साधकाच्या जीवनात मोहाच्या सुंदर फुलबागा निर्माण करतो अन् एखाद्या बेसावध क्षणी मोहाच्या निसरड्या वाटेवरून जाता-जाता त्याचा पाय असा घसरतो की, हरिभक्तीमध्ये परायण होता-होता कधी इंद्रिय भक्त परायण होतो, याचा त्याचा त्यालाच पत्ता लागत नाही. हो! एक गोष्ट निश्चित की, जेव्हा काम हा सात्त्विक इच्छेपुरता मर्यादित राहतो, तेव्हा त्याचे पुरुषार्थामध्ये परिवर्तन होते. एखाद्या सद्गृृहस्थाने शुद्ध विचारांच्या कन्यापुत्रांना जन्म देणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना जगण्याचे बळ देता-देता त्यांच्याकरवी सत्त्वशील समाज निर्मितीचे स्वप्न पाहणे, एवढ्यापुरता काम जर मर्यादित राहिला, तर समाजात सात्त्विक विचारांचा झेंडा फडकविणाऱ्या कन्यापुत्रांचा अभिमान राष्ट्रास वाटू लागतो, परंतु हाच काम जेव्हा वासनेत रूपांतरित होतो, तेव्हा पुरुषार्थाचा विकार केव्हा झाला, हे साधकाच्याच नव्हे, तर संत, महंत, मठाधीशांच्यासुद्धा लक्षात येत नाही. जर काम-क्रोधासारख्या चोरांच्या बरोबर राहून परमार्थाचा पैलतीर गाठता येईल, असे पारमार्थिकास वाटत असेल, तर त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. हा तर कमरेला धोंडा बांधून भरलेल्या नदीत उडी मारण्याचा प्रकार झाला. म्हणून परमार्थाच्या मार्गावरील वाटसरूंना सावध करताना ज्ञानोबा माउली म्हणाले होते,
चोराचिया संगे क्रमिता पै पंथ । ठकुनिया घात करिती
काम, क्रोध, लोभ घेऊनिया संगे ।
परमार्थासी रिंघे तोचि मुर्ख ।
ज्ञानोबा माउलींच्या दृष्टीने काम-क्रोधांना बरोबर घेऊन परमार्थ करणे हाच मुळात मूर्खपणा आहे आणि तोच मूर्खपणा ज्ञानदेवांनंतर ७५0 वर्षांनीसुद्धा आम्ही करीत आहोत. त्यामुळे बलात्कार, हिंसा, अनैतिकता, अत्याचार, विवेकहीन वर्तन हाच आजच्या समाजाचा शिष्टाचार होऊ पाहत आहे. षड्रिपूंच्या अतिरिक्त प्रभावामुळेच हे सारे घडत आहे. या सत्याचे निक्षूण प्रतिपादन ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा, एकोबा इ. संतानी केले.