हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष असं महत्व आहे. ‘अक्षय्य तृतीया’ (Akshaya Tritiya) ही अशीच एक महत्त्वाची तिथी मानली जाते. वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. तसेच अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असेही मानले जाते, त्यामुळेही हा दिवस फार महत्वाचा आहे. 

काय आहे महत्त्व?

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य' असे मिळते, असं मानलं जातं. तसेच या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते.

त्यासोबतच जो  मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो, असे मानले जाते. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.

कशी केली जाते पूजा?

पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची, लक्ष्मीची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण करावे. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते शक्य नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे. या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे, असाही एक समज आहे. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात.

या दिवशी काय केलं जातं?

दिवशी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. याने घरात समृद्धी आणि भरभराटी येते असा समज आहे. या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, नवीन वस्त्र, दागिने विकत घेणे, नवीन वाहन खरेदी अशा गोष्टी केल्या जातात. 

दानाला महत्त्व

या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. या दिवशे मातीचे माठ किंवा रांजण, आंबे, मिठाई किंवा गोड पदार्थ, वस्त्रे किंवा कापड दान करावे.

मुहूर्त –

मंगळवार, 7 मे 2019 - अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया पूजा मुहूर्त – सकाळी 05:40 ते दुपारी 12:17 पर्यंत

सोने खरेदी करण्याचा मुहूर्त- सकाळी 6.26 ते रात्री 11.47 पर्यंत

Web Title: Akshaya Tritiya : Significance of Akshaya Tritiya, History, Importance and Shubh Muhurat for puja and to buy gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.