मन्यारखेडा वासियांच्या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांना फुटला घाम

By विलास.बारी | Published: June 5, 2023 06:32 PM2023-06-05T18:32:35+5:302023-06-05T18:34:02+5:30

मनसे पदाधिकारी व मन्यारखेडा येथील रहिवाश्यांनी केलेल्या या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली होती.

hearing the problems of Manyarkheda residents to Gulabrao Patil in jalgaon | मन्यारखेडा वासियांच्या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांना फुटला घाम

मन्यारखेडा वासियांच्या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांना फुटला घाम

googlenewsNext

जळगाव : तालुक्यातील मन्यारखेडा येथील नागरिकांनी सोमवारी मनसेच्या नेतृत्वाखाली मुलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एका पदाधिकाऱ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मुखवटा घालून, कपडे परिधान करून प्रतिकात्मकरित्या पालकमंत्र्यांकडे आपल्या व्यथा मांडल्या. या समस्या ऐकून गुलाबराव पाटलांनाही चांगलाच घाम फुटला होता. मनसे पदाधिकारी व मन्यारखेडा येथील रहिवाश्यांनी केलेल्या या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली होती.

तालुक्यातील मन्यारखेडा येथील गावठाण भागातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत येथील नागरिकांनी ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील समस्या मार्गी लागत नसल्याने मनसे व गावातील महिला ग्रामस्थांनी सोमवारी आकाशवाणी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हंडा मोर्चा काढला. या मोर्चात महिलांनी हातात हंडे घेवून, आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी मनसेचे जिल्हा उपसंघटक राजेंद्र निकम, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, संदीप पाथरे यांच्यासह मन्यारखेडा येथील नागरिक उपस्थित होते.

अन् पालकमंत्र्यांवर केली प्रश्नांची सरबत्ती...

या आंदोलनात मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मुखवटा घालून, पालकमंत्र्यांसारखे कपडे परिधान करून आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे सर्व आंदोलकांनी संबधित व्यक्तीला पालकमंत्री असल्याचे दर्शवित, आपल्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करुन, चांगलेच धारेवर धरले. त्यात पालकमंत्र्यांच्या मुखवटा घातलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यानेही पालकमंत्र्यांच्या स्टाईलमध्येच समस्या ऐकून घेतल्या. या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या अनेकांचे लक्ष वेधले. त्यानंतर मन्यारखेडा ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Web Title: hearing the problems of Manyarkheda residents to Gulabrao Patil in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.