जिथे संपला ‘सैराट’, तिथे जन्मला अनाथांचा नाथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:35 PM2018-06-19T23:35:02+5:302018-06-19T23:35:02+5:30

सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले.

Where the 'sarat' ended, there was the orphanage of the orphan! | जिथे संपला ‘सैराट’, तिथे जन्मला अनाथांचा नाथ !

जिथे संपला ‘सैराट’, तिथे जन्मला अनाथांचा नाथ !

googlenewsNext
ठळक मुद्दे४७८ अनाथांचा पिता : सागर रेड्डीच्या धडपडीची झेप

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले. त्या उत्तराचे नाव आहे, सागर रेड्डी!
आंतरजातीय विवाह केलेल्या मायबापांच्या पोटी जन्माला आलेला हा पोरगा. आईबाबाचा खून झाला अन् तो अनाथ झाला. सागर रेड्डीची इथपर्यंतची कहाणी ‘सैराट’सारखीच. पण इथून पुढची कहाणी सिनेमाच्या पडद्यावर मावणारी नाही. हा अनाथ पोरगा आता इंजिनिअर झाला अन् शेकडो अनाथांचा पालक झाला. हा अनाथांचा नाथ सध्या यवतमाळात आलाय. इथल्या अनाथांसाठी ताकद घेऊन..!
ही कहाणी सुरू झाली आंध्र प्रदेशात. व्यंकटेश गोविंद रेड्डी आणि पौर्णिमा डेव्हीड काळे या दोघांनी आंतरजातीय लग्न केले. समाजाला हा विवाह खटकला. समाजकंटकांनी या दाम्पत्याचा खून केला. पण त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा जिवंत राहिला. आजोबांनी त्याला लोणावळ्याच्या आंतरभारती बालग्राम या अनाथाश्रमात नेऊन सोडून दिले. तो १८ वर्षांचा झाला अन् अनाथाश्रमाची दारेही त्याच्यासाठी बंद झाली. आता बाहेरच्या जागात आल्यावर त्याच्याकडे स्वत:चे नाव नव्हते, आडनाव नव्हते.
त्यामुळे जातही नव्हती अन् जातीचे प्रमाणपत्रही नव्हते. घरच नव्हते, तर रहिवासी दाखला कुठून मिळणार? हे सगळे नव्हते म्हणून मतदार ओळखपत्र नव्हते अन् त्यामुळे तो भारताचा नागरिकही नव्हता!
पण तो हरला नाही. उघड्या आकाशाखाली उपाशी निजला. पावसात भिजला. आंध्र प्रदेशातील आपल्या आजोबांचा शोध घेतला. आपले खरे नाव जाणून घेतले. साºया संकटांवर मात करत शिकला. एका कंपनीत इंजिनिअर झाला. पण गलेलठ्ठ पगार घेत सुखासीन आयुष्य जगण्यापेक्षा त्याने मागे वळून पाहिले. अनाथाश्रमातून १८ वर्षे पूर्ण करून बाहेरच्या जागात येणाऱ्या मुला-मुलींचे हाल आपण थांबविले पाहिजे, हा निर्धार केला. २००८ मध्ये सागरने मुंबईत एकता निराधार संघ स्थापन केला. स्वत:चा पूर्ण पगार पणास लावून दोन फ्लॅट भाड्याने घेऊन त्यात अनाथांना ठेवले. जेऊ घातले. शिकवले. नोकरीलाही लावले.
वणीत सुरू केले अनाथांसाठी वसतिगृह
आज सागरच्या निराधार संघाच्या वसतिगृहात एकूण ४७८ अनाथ मुलं-मुली आहेत. तर आतापर्यंत सागरने ११२८ अनाथांना नोकरीला लावून दिले. तर अनाथाश्रमातून बाहेरच्या जगात येणाºया ६० मुलींचे सुयोग्य स्थळी लग्न लावून दिले. त्यांचे कन्यादान स्वत:च केले. आज एकता निराधार संघाच्या माध्यमातून सागरने मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर यासह कर्नाटकातील बंगळूर, हुबळी, रायचूर आणि तेलंगणातील हैदराबादमध्ये अनाथांसाठी वसतिगृह सुरू केले आहेत. आता तो विदर्भात पोहोचलाय. वणी येथील विजय नगराळे यांच्या माध्यमातून अनाथांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. १२ अनाथ मुला-मुलींना तेथे आश्रय मिळाला असून त्यांच्या शिक्षण, जेवण आणि निवासाची सोय झाली आहे.
मदत करा.. मदत मिळवा!
अनाथ सागर रेड्डीने वणीत अनाथांसाठी वसतिगृह सुरू केले आहे. पण गरीब कुटुंबातील होतकरू मुला-मुलींना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील गरजू मुला-मुलींनाही येथे आश्रय दिला जाईल, असे सागरने सांगितले. ज्यांना ज्यांना या वसतिगृहाची मदत हवी आहे, त्यांनी संपर्क साधावा, त्यासोबतच ज्यांना या कार्यासाठी मदत करायची इच्छा आहे, त्यांनीही संपर्क करावा, असे आवाहन सागर रेड्डीने केले आहे. तसेच पुढील महिन्यात बेरोजगार पण गरजू तरुण-तरुणींसाठी वणीमध्ये रोजगार मेळावा घेणार असल्याचेही त्याने सांगितले.

Web Title: Where the 'sarat' ended, there was the orphanage of the orphan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.