पाणी टँकरला ‘जीपीआरएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 09:36 PM2018-03-11T21:36:54+5:302018-03-11T21:37:08+5:30

नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे.

Water tanker 'GPRS' | पाणी टँकरला ‘जीपीआरएस’

पाणी टँकरला ‘जीपीआरएस’

Next
ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषदेचा निर्णय : टंचाई कक्षात मिळणार वितरणाची स्थिती

रूपेश उत्तरवार।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे. या पाण्याच्या व्यवसायाला चाप बसविण्यासाठी नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या टँकरवर जीपीआरएस सिस्टीम (ट्रॅकर) लावण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या १५ टँकरला असे ट्रॅकर लावण्यात आले असून नगरपरिषदेत टंचाई कक्षातून यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. टंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा हा एक प्रयत्न होय.
यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला महिनाभरानंतरही पाणी येत नाही. परिणामी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु काही खासगी टँकरधारक आपण अधिग्रहित केलेले टँकरधारक असल्याचे सांगून नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करतात आणि त्याची गावात विक्री करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाईलाजाने नागरिकांना पैसे मोजून टँकर घ्यावे लागते. हा पाण्याचा व्यवसाय मोडून काढण्यासाठी नगरपरिषदेने एक निर्णय घेतला आहे. अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर मोफत पाणी असा फलक लावावा लागणार आहे. त्यावर नगरसेवकाचे आणि वार्डाचे नावही लिहिले जाणार आहे. या टँकरचा क्रमांक नगरपरिषदेकडे राहणार आहे. विशेष म्हणजे नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर जीपीआरएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे टँकर कोणत्या भागात पाणी घेऊन पोहोचले, प्रत्यक्ष सांगितलेल्या ठिकाणीच टँकर पोहोचला काय याची माहिती तत्काळ नगरपरिषदेला मिळणार आहे. तसेच कमी फेºया मारून अधिक बिल काढणाºया टँकरधारकांवरही या प्रणालीमुळे चाप बसणार आहे.
नगरपरिषदेत यासाठी टंचाई कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी लावलेल्या यंत्रणेत शहरातील सर्वच टँकरची स्थिती दिसणार आहे. तसेच टँकरच्या स्थितीची माहिती नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाºयांना तत्काळ कळविली जाणार आहे. यामुळे टँकरच्या हेराफेरीला आळा बसून शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुकर होणार आहे
नगरसेवकाला एसएमएस
शहरात १२ दिवसानंतर नळाचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. परंतु १२ दिवसानंतरही अनेक भागात पाणी पोहोचत नाही. काही भागात तर महिना झाला तरी नळ आले नाही. आता नळ येत असलेल्या भागातील नगरसेवकाला जीवन प्राधिकरणातून मोबाईलवर संदेश जाणार आहे. त्यासाठी शहरातील नगरसेवकाचा ग्रुप तयार करण्यात आला आहे. तसेच ज्या भागात नळ येणार आहे, त्या भागात आॅटोरिक्षाच्या मदतीने ध्वनीक्षेपकावरून माहिती दिली जाणार आहे. तसेच सोडलेले पाणी त्या भागात पोहोचले किंवा नाही याचीही माहिती नगरसेवकांनी प्राधिकरणाला द्यावयाची आहे. पाणी पोहोचत नसल्यास त्या भागात टँकरची व्यवस्था करावयाची आहे.
मनुष्यबळाचा तुटवडा
यवतमाळ शहरातील ७९ विहिरींची साफसफाई करावी लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. परंतु विहीर स्वच्छ करण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

Web Title: Water tanker 'GPRS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा