वणीत मनसेचे नगरसेवक फुटले

By admin | Published: August 30, 2015 02:12 AM2015-08-30T02:12:48+5:302015-08-30T02:12:48+5:30

येथील नगराध्यक्ष प्रिया लभाने यांच्याविरूद्धचा अविश्वास ठराव शनिवारी पारित झाला.

Vansat MNS corporator broke | वणीत मनसेचे नगरसेवक फुटले

वणीत मनसेचे नगरसेवक फुटले

Next

नगराध्यक्षांवर अविश्वास मंजूर : २० सदस्यांचे ठरावाला समर्थन
वणी : येथील नगराध्यक्ष प्रिया लभाने यांच्याविरूद्धचा अविश्वास ठराव शनिवारी पारित झाला. त्यामुळे नगराध्यक्ष आता पायउतार झाल्या आहेत. २१ नगरसेवकांनी त्यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यापैकी २0 सदस्यांनी ठरावाच्या समर्थनार्थ हात उंचावले.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तब्बल आठ उमेदवारांना निवडून दिले होते. त्यानंतर सात अपक्ष, चार राष्ट्रवादी काँग्रेस, तीन शिवसेना, दोन काँग्रेस आणि एक भाजपाचा उमेदवार निवडून आला होता. पहिल्या अडीच वर्षांत मनसेला बाजूला सारून सर्वपक्षीय मदतीने शिवसेनेच्या अर्चना थेरे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी विविध पक्षीय मदतीने मनसेच्या प्रिया लभाने नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. मात्र उण्यापुऱ्या वर्षभरातच आता त्या पायउतार झाल्या आहे. आता तूर्तास अपक्ष असलेल्या नगरसेविका करूण कांबळे या नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. कारण नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असून या प्रवर्गातील केवळ लभाने आणि कांबळे या दोनच महिला नगरसेविका आहेत.
गेल्या २१ आॅगस्टला २१ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लभाने यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. प्रत्यक्षात ठराव दाखल करताना मनसेच्या गिता सूर वगळता इतर २0 सदस्य उपस्थित होते. ते सर्व सदस्य आज ठरावाच्या बाजूने होते. शनिवारी दुपारी २ वाजता नगरपरिषद सभागृहात अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा सुरू झाली. तत्पूर्वीच उपाध्यक्ष अशोक बुरडकर यांच्यासह नितीन आत्राम, इंदिरा पारखी, पुष्पा कुळसंगे, कीर्ती देशकर, अर्चना थेरे, अर्चना ताजने, आशा टोंगे, मिरा मोहितकर, निर्मला प्रेमलवार, धनराज भोंगळे, विनोद निमकर, राजू डफ, विजय नागपुरे, अभिजित सातोकर, सिद्दीक रंगरेज, मंदा पुसनाके, करूणा कांबळे, दिगांबर पालमवार आणि अ‍ॅड.इक्बाल खलील हे २0 सदस्य सभागृहात पोहोचले होते. यापैकी काही सदस्य आज प्रथमच बाहेर गावावरून थेट विविध वाहनांव्दारे नगरपरिषदेत पोहोचले. मनसेचे गटनेते तथा आरोग्य सभापती धनंजय त्रिंबकेही नंतर सभागृहात दाखल झाले.
यानंतर दुपारी २ वाजता विशेष सभेला सुरूवात झाली. पीठासीन अधिकारी शिवानंद मिश्रा यांनी ठरावाच्या बाजूने कौल घेतला असता, सभागृहातील २१ पैकी २0 सदस्यांनी ठरावाच्या समर्थनार्थ हात उंचावले. केवळ त्रिंबके यांनी हात उंचावला नाही. त्यामुळे हा अविश्वास ठराव २0 मतांनी पारित झाल्याचे मिश्रा यांनी जाहीर केले. परिणामी नगराध्यक्ष प्रिया लभाने पायउतार झाल्या आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)
मनसेचा बुरूज अखेर ढासळला
विदर्भात केवळ वणीतच मनसेने नगरपरिषदेवर वर्चस्व स्थापित केले होते. आपले पदाधिकारी तेथे बसविले होते. मात्र वर्षभरातच मनसेचा हा बुरूज ढासळला आहे. त्यांच्याच पाच सदस्यांनी ठरावाच्या बाजूने ‘हात वर’ केल्याने अविश्वास ठराव पारित होण्यास मदत मिळाली. परिणामी मनसेचा विदर्भातील वणीचा एकमेव बुरूज मनसेच्या ताब्यातून निसटला. विशेष म्हणजेच नुकतीच मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर काही दिवसातच त्यांच्या हातून पालिका निसटली आहे.
पाच सदस्यांनी झुगारला व्हीप
मनसेच्या आठपैकी पाच सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून व्हीप झुगारला. त्यात अशोक बुरडकर, राजू डफ, मिरा मोहितकर, इंदिरा पारखी आणि अभिजित सातोकर याचा समावेश आहे. गटनेत्यांनी त्यांना रजिस्टर्ड पोस्टाव्दारे आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर व्हीप बजावून ठरावाच्या विरूद्ध राहण्याचे निर्देश दिले होते. शनिवारी सभागृहातही गटनेता धनंजय त्रिंबके मिरा मोहितकर यांच्याकडे व्हीप देण्यासाठी जात होते, असे सिद्धीक रंगरेज यांनी सांगितले. त्यावेळी ते भ्रमणध्वनीवरही बोलत होते. त्याला रंगरेज यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्रिंबके यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर भ्रमणध्वनी बंद केला.

Web Title: Vansat MNS corporator broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.