महाराजाचा असाही कारनामा, जत्रेला नेत असल्याचे सांगून युवतीला पळविले

By विलास गावंडे | Published: January 20, 2024 03:13 PM2024-01-20T15:13:29+5:302024-01-20T15:13:52+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार : डोकेदुखीवर घेत होती उपचार, नेर पोलिसात गुन्हा दाखल

Such a feat of Maharaja, he ran the girl away saying that he was leading the fair | महाराजाचा असाही कारनामा, जत्रेला नेत असल्याचे सांगून युवतीला पळविले

महाराजाचा असाही कारनामा, जत्रेला नेत असल्याचे सांगून युवतीला पळविले

नेर (यवतमाळ) : तरुणीला डोकेदुखीच्या असह्य वेदना होत होत्या. खूप दवाखाने केले, पण बरी झाली नाही. एकाने महाराजाकडे उपचार घेण्याचे सुचविले. त्यानुसार महाराजाला गाठण्यात आले. पण तो विश्वासघातकी निघाला. २२ वर्षीय मुलीला जत्रेला नेत असल्याचे सांगून सोबत नेले. पण परतलाच नाही. अखेर पोलिसात तक्रार केली. महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला. या महाराजाचा शोध घेतला जात आहे. 

नेर तालुक्याच्या एका गावातील कुटुंबासोबत हा प्रकार घडला. या कुटुंबातील २२ वर्षीय युवती व तिच्या बहिणीला बहिणीला डोकेदुखीचा त्रास होता. गावातील एका तरुणाने त्यांना कोहळा पुनर्वसन (सावरगाव काळे) येथील प्रकाश जनार्दन नाईक (५०) या महाराजाकडे उपचाराचा सल्ला दिला. प्रकाश महाराज घरगुती व मांत्रिक पद्धतीने उपचार करतात. त्याच्या उपचाराने अनेक रोगी बरे झाल्याची पुष्टीही जोडली. मुलीच्या वडिलांनी मुलीला महाराजाकडे नेले. 

युवतीच्या कुटुंबासोबत महाराजाचा घरोबा वाढला. मुलीचे वडील व महाराज लाखनवाडी (जि.अमरावती) येथे जत्रेलाही जाऊन आले. महाराजाने उपचार सुरू असलेल्या २२ वर्षीय युतीवर प्रेमाचा पाश आवळला. १० जानेवारीच्या रात्री १२ वाजता महाराज चारचाकीने युवतीच्या घरी आले. उपचार सुरू असलेल्या मुलीला लाखनवाडी येथे जत्रेला घेऊन जात असल्याचे सांगत सोबत नेले. ११ जानेवारीपासून महाराजांचा फोन बंद झाला. 

मुलगी अन् महाराजही संपर्कात नसल्याने कुटुंबाची धाकधूक वाढली. आपली फसवणूक झाल्याचे पित्याच्या लक्षात आले. प्रकाश महाराजाने मुलीला पळविल्याची तक्रार नेर पोलिसात केली. यानुसार प्रकाश महाराज नाईक याच्याविरुध्द भादंवि ३६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास नेरचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.

Web Title: Such a feat of Maharaja, he ran the girl away saying that he was leading the fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.