सेनेत नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध

By admin | Published: December 23, 2014 11:11 PM2014-12-23T23:11:12+5:302014-12-23T23:11:12+5:30

शिवसेनेत नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध सुरू झाला आहे. त्यासाठी माजी आमदारासह डझनावर नावे चर्चेत आहेत. संजय राठोड यांच्याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची

Seneet's new district chief's search | सेनेत नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध

सेनेत नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध

Next

डझनावर नावे चर्चेत : माजी आमदारांचा जोर, राज्यमंत्र्यांचा शब्द ठरणार निर्णायक
यवतमाळ : शिवसेनेत नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध सुरू झाला आहे. त्यासाठी माजी आमदारासह डझनावर नावे चर्चेत आहेत.
संजय राठोड यांच्याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आहे. ते गत दहा वर्षांपासून शिवसेनेचे आमदार आहेत. दिग्रस-दारव्हा मतदारसंघातून यावेळी तिसऱ्यांदा ते निवडून आले आहे. त्यांच्याकडे आमदारकी सोबतच शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली. आता राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. त्यात महसूल राज्यमंत्री म्हणून राठोड यांची वर्णी लागली. त्यामुळे राठोड यांच्याकडील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद अन्य कुणाला तरी दिले जाणार आहे. राठोड राज्यमंत्री झाल्यापासूनच शिवसेनेत नवे जिल्हा प्रमुख कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातूनच इच्छुक व स्पर्धेतील नावांचा आकडा डझनावर पोहोचला आहे. त्यात वणीचे माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर, राजेंद्र गायकवाड, प्रवीण पांडे, किशोर इंगोले, संतोष डोमाळे, बाबूपाटील जैत, परमानंद अग्रवाल आदींची नावे आघाडीवर आहेत. हे पदाधिकारी गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेत एकनिष्ठ आहेत. पक्षाच्या शेकडो आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. गेल्या कित्येक वर्षानंतर यावेळी पहिल्यांदाच त्यांना जिल्हा प्रमुख होण्याची संधी चालून आली आहे.
यवतमाळ मतदारसंघात ५० हजारांवर मते मिळविणाऱ्या संतोष ढवळे यांचे नाव जिल्हा प्रमुख पदासाठी प्रकर्षाने पुढे येत आहे. मात्र आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने ते प्रत्येकच बाबींसाठी पक्षावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. ‘शिवसेना स्टाईल’ने आर्थिक बाजू सांभाळण्याचा त्यांचा ‘हातखंडा’ नाही. स्थानिक श्रेष्ठींच्या मर्जीतील म्हणून हरिहर लिंगनवार यांचे नाव शिवसैनिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे. ते घरच्याच संस्थेवर पीटीआय आहेत, दिग्रस-दारव्हा-नेर या बालेकिल्ल्यात त्यांचा तेवढा हस्तक्षेप राहणार नाही. शिवाय जिल्ह्यात ते पक्षबांधणीसाठी उपयोगी ठरू शकतात. म्हणून स्थानिक पक्ष श्रेष्ठींना लिंगनवार यांचे नाव सोईचे वाटत असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जाते. याशिवाय ‘लवचिक’ राहण्याची हमी देऊ शकतील, अशा काही नावांचाही ऐनवेळी विचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संजय राठोड सूचवतील तेच नाव निश्चित होईल, याबाबत शिवसैनिकांच्या मनातही कुठलीच साशंकता नाही. यावरून नवा जिल्हा प्रमुख हा राठोड यांच्या मर्जीतील राहण्याची चिन्हे आहे. नव्या जिल्हा प्रमुखाच्या नावाची औपचारिक घोषणा मात्र संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांच्यामार्फत ‘मातोश्री’च्या परवानगीने होण्याची शक्यता आहे.‘मर्जीतील’ हा ऐकमेव निकष लावला गेल्यास अनेक दिवसांपासून ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या भूमिकेत असलेले अन्य पदाधिकारी आक्रमक होऊन थेट ‘मातोश्री’वर दाद मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेत जिल्हा प्रमुख होण्यासाठी अनेकांच्या नावाची चर्चा आणि प्रचंड स्पर्धा असली तरी त्यात बाजी कोण मारतो याकडे निष्ठावंत शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. विधीमंडळ अधिवेशनानंतर नव्या वर्षात नव्या जिल्हा प्रमुखाच्या नावाची घोषणा होण्याची चिन्हे आहे. आडोसा म्हणून ‘मातोश्री’ व दिवाकर रावते यांचे नाव घेतले जात असले तरी संजय राठोड म्हणतील तोच जिल्हा प्रमुख होणार, एवढे निश्चित.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Seneet's new district chief's search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.