कलावंतांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वस्त सभागृह द्यावे; विजय दर्डा यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:49 PM2018-01-22T13:49:53+5:302018-01-22T13:50:07+5:30

साहित्यिक, कलावंतांचा खरा सन्मान करायचा असेल, तर सरकारने प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांना सभागृह बांधून द्यावे, अशी सूचना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे येथे मांडली.

Provide resonable auditorium to every district for artists; Vijay Darda | कलावंतांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वस्त सभागृह द्यावे; विजय दर्डा यांची सूचना

कलावंतांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वस्त सभागृह द्यावे; विजय दर्डा यांची सूचना

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : साहित्यिक, कलावंतांचा खरा सन्मान करायचा असेल, तर सरकारने प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांना सभागृह बांधून द्यावे, अशी सूचना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे येथे मांडली. त्यावर ना. गडकरींनीही सकारात्मक प्रतिसाद देत जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.
साहित्यिक व्यासपीठावर एकत्र आलेल्या दोन राजकीय धुरिणांनी रविवारी रसिकांच्या मनातली इच्छा पुरी केली. प्रसंग होता विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपाचा अन् व्यासपीठ होते वक्ता दशसहस्त्रेषू राम शेवाळकर साहित्य नगरीचे. तीन दिवसीय विदर्भ साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. केंद्रीय भूपृष्ठ संचालन, जहाज बांधणी व नदी विकास मंत्री नितीन गडकरी, तसेच लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यावेळी विशेष अतिथी म्हणून लाभले होते.
आपापल्या वकुबाचा झेंडा दिल्लीपर्यंत फडकविणारे नेते काय बोलतील याबाबत उपस्थित हजारो रसिकांमध्ये उत्सुकता होती. उत्सुक रसिकांना सुखद धक्का देत माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांच्याच मनातला मुद्दा मांडला. ते म्हणाले, देशाचे चारित्र्य हे लेखक, कलावंतांच्या सन्मानावर अवलंबून असते. ज्या देशात लेखक, कलावंतांचा सन्मान होतो, तो देश प्रगत ठरतो. परंतु, ग्रामीण भागातील कलावंतांना त्यांच्या आविष्कारासाठी व्यासपीठ मिळत नाही. मोठ्या शहरांमध्ये व्यासपीठं असली तरी ती महागडी आहेत. तेवढा पैसा खर्च करण्याची कलावंतांची ऐपत नसते. शासनाने ही बाब लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कलावंत, लेखकांना सभागृह उपलब्ध करून द्यावे. अशा सभागृहाचे दरही कमी ठेवावे. तेव्हाच कलावंतांना आपली कला सहज सादर करता येईल, असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
व्यासपीठावरच उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत पाऊल उचलण्याची सूचनाही विजय दर्डा यांनी केली. त्याची दखल घेत ना. गडकरी म्हणाले, यासंदर्भात मी स्वत: लक्ष घालीन. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहे. कलावंत व लेखक समाजाला दिशा देतात. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, यावर उभयतांनी आपल्या भाषणांमधून प्रकाश टाकला. कलावंतांच्या सभागृहासाठी हा सकारात्मक प्रतिसाद पाहून रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Web Title: Provide resonable auditorium to every district for artists; Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.