आईच्या आठवणी, शिक्षणाचे मोल अन् संस्कारांची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:22 PM2018-07-19T23:22:00+5:302018-07-19T23:24:00+5:30

आईच्या आठवणींचा जागर करीत, शिक्षणाची महती सांगत गुरुवारी मातोश्री दर्डा सभागृहात शेकडो विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी वाटण्यात आली. नगरपरिषद शाळांतील तब्बल १२०० विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य देण्यात आले अन् त्यांच्या पाठीवर लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थापही मिळाली.

 Mother's memories, education values, and values | आईच्या आठवणी, शिक्षणाचे मोल अन् संस्कारांची शिदोरी

आईच्या आठवणी, शिक्षणाचे मोल अन् संस्कारांची शिदोरी

googlenewsNext
ठळक मुद्देमातोश्री वीणादेवी दर्डा स्मृतिदिन : जवाहरलाल दर्डा फाउंडेशनतर्फे १२०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आईच्या आठवणींचा जागर करीत, शिक्षणाची महती सांगत गुरुवारी मातोश्री दर्डा सभागृहात शेकडो विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी वाटण्यात आली. नगरपरिषद शाळांतील तब्बल १२०० विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य देण्यात आले अन् त्यांच्या पाठीवर लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थापही मिळाली. गरजू विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळले आणि मुखातून एका सुरात जयघोष झाला... ‘भारत माता की जय’!
हा हळूवार प्रसंग होता मातोश्री वीणादेवी जवाहरलाल दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनाचा. लोकमत परिवार आणि जवाहरलाल दर्डा फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आमची आई अन् आमची शाळा
मातोश्री वीणादेवी यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. माजी खासदार विजय दर्डा यांनी नगरपरिषद शाळांमधील मुलांपुढे आपल्या आईच्या आठवणी ‘शेअर’ केल्या. ते म्हणाले, घरात पूर्ण संपन्नता असली तरी आपल्या मुलांनी सर्वसामान्यांच्या शाळेतच शिकले पाहिजे, ही आमच्या आईची ईच्छा होती. त्यानुसार आम्हा दोघाही भावांचे नाव नगरपरिषद शाळेतच टाकण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक एकदा बाबूजींना म्हणालेही होते, मुलांना यवतमाळात शिकविण्यापेक्षा मुंबईत का शिकवित नाही? पण बाबूजींनी सांगितले, शिक्षण दोन प्रकारचे असते. एक शाळेतून मिळणारे शिक्षण आणि दुसरे शिक्षण म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनातून मिळणारी ऊर्जा. माझ्या मुलांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे. म्हणूनच आम्ही नगरपरिषद आणि पुढे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. घरी गाडी असूनही शाळेत पायी जायचो. आमचे खेळही सर्वसामान्यांचे होते. तो जगण्याचा वेगळाच आनंद होता. या शाळांच्या संस्कारातूनच आम्ही घडलो. या शाळांमधून शिकणाऱ्या मुलांच्या अडचणी ठाऊक आहेत. म्हणून आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, मुलांनी शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत झाले पाहिजे. तशी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांनी पूर्ण करावी, अशी अपेक्षाही माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली.
आईचा आदर करा, तुमचाही आदर होईल
माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मुलांना जीवनात आईचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, ज्यांना आई आहे तेच भाग्यवान. माझी आई कमी शिकलेली होती. पण समाज सुसंस्कृत व्हावा, म्हणून तिने कार्य केले. बाबूजी स्व. जवाहरलाल दर्डा हे १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पावणे दोन वर्षे जबलपूरच्या जेलमध्ये होते. त्यावेळी आईनेच संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली. आपल्याकडे पैसा नसला तरी आपले आयुष्य संपन्न वाटले पाहिजे, कपडे नेहमी स्वच्छ असले पाहिजे, ही शिकवण आम्हाला आईने दिली. लहान असताना आम्हाला वर्षातून दोनच ड्रेस मिळायचे. आई तांब्यात कोळसे टाकून ते इस्त्री करून द्यायची. शाळेतून आल्यावर ड्रेसची घडी करून गादीखाली ठेवायची. आई जगात फार फिरली नाही. बाहेर फिरण्यापेक्षा घरातील मोठ्या माणसांची सेवा करणे हेच तिला महत्त्वाचे वाटले. आईचा नेहमी आदर करा, तेव्हाच तुम्ही मोठे झाल्यावर सर्व तुमचाही आदर करतील, असा सल्लाही माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे एडिटर-इन-चीफ तथा राज्याचे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरीताई आडे, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, नगरपरिषद शिक्षण सभापती नीता भास्कर केळापुरे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिलकुमार अढागळे, नगरपरिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष माधुरी अराठे, बाजार समिती सभापती रवी ढोक, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, नगरसेवक सुजित राय, गजानन इंगोले, अमोल देशमुख, बबलू देशमुख, वैशाली सवाई, विशाल पावडे, कीर्ती राऊत, पंकज मुंदे, मनोज मुधोळकर, सुषमा राऊत, माजी नगरसेवक कैलास सुलभेवार, आनंद गायकवाड, अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, दत्ता कुलकर्णी आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लोकमत जिल्हा कार्यालयातील चमू तसेच विलास देशपांडे, सुभाष यादव, प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर, प्रा. अभय भिष्म, अमित गुरव, अतुल भुराने, शेख सलीम शेख मोईद्दीन आदींनी परिश्रम घेतले.
चिमुकल्यांची दर्डा उद्यानात सैर
शालेय साहित्य वाटपाच्या निमित्ताने नगरपरिषद शाळांचे १२०० विद्यार्थी दर्डा उद्यान परिसरात आले होते. पंधरा दिवस अखंड पावसाळी वातावरणानंतर गुरुवारी सकाळी पहिल्यांदाच स्वच्छ दिवस उगवला होता. उद्यानाच्या लुसलुशित हिरवळीवर कोवळी उन्ह पडल्याने वातावरण रमणीय बनले होते. या उल्हसित वातावरणात विद्यार्थ्यांनी संपूर्ण दर्डा उद्यान फिरून छोट्या सहलीचा आनंदही लुटला.
प्रेरणास्थळी आदरांजली सभा
मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर आदरांजली सभा पार पडली. दर्डा परिवारातील छोट्या-मोठ्यांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.

Web Title:  Mother's memories, education values, and values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.